५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली असून १६ जानेवारीला त्याची अधिकृत घोषणा होईल असे वृत्त आहे. जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपला जिल्हयात जि.प.च्या १० जागा मागितल्याचे वृत्त आहे. जि.प. आणि. पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप-शिवसेनेची युती झाल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. दिपक पटवर्धन यांनी सांगितले. दरम्यान न.प. निवडणूक स्वबळावर लढणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही महायुतीसाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५६ गट आणि पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १६ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. या पार्श्वभुमीवर निवडणूक जाहीर होताच युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या.
ही निवडणूक युती म्हणूनच लढविण्याचे ठरले असल्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यावतीनेही सांगण्यात आले आहे. ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत गेल्या रात्री एक प्राथमिक पातळीवर बैठक झाली. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे नेते त्या बैठकीला उपस्थित होते. माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. दिपक पटवर्धन, अनिकेत पटवर्धन, राजेश बेंडल, यांच्यासह दोन्ही पक्षांचे काही प्रमुख पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. या बैठकीत जागावाटपाचा आढावा घेण्यात आला. युतीबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. युती झाली आहे असे अॅड. दिपक पटवर्धन यांनी सांगितले. जागावाटपाबाबत त्यांनी तपशिल दिला नाही. मात्र १६ जानेवारीला अधिकृत घोषणा होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
४ जि.प. ४ पं.स. गण – हाती आलेल्या माहितीनुसार , भारतीय जनता पक्षाने जिल्हयात १० जि.प. गटांची मागणी केली असल्याचे वृत्त आहे. गुहागर आणि रत्नागिरीमध्ये अधिक जागांची मागणी असल्याचे कळते. रत्नागिरी तालुक्यात जि.प.च्या ४ आणि पंचायत समितीच्या ४ जागा भाजपने मागितल्याचे वृत्त आहे. अंतिम निर्णय व्हायचा आहे. अॅड. पटवर्धन, डॉ. नातू आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यातील चर्चेनंतर त्याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.
पालकमंत्र्यांनी घेतली बैठक – दरम्यान भाजपासोबत झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी बुधवारी शिवसेनेच्या विभाग प्रमुखांची आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रचाराविषयी रणनिती आखण्यात आली असून रत्नागिरीतील नवनिर्वाचित नगरसेवकांकडे काही जि.प. गट आणि पंचायत समितींच्या गणांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आ. शेखर निकमांशीही चर्चा ? – पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्याशीही चर्चा केल्याचे वृत्त आहे. ते देखील महायुतीसाठी उत्सुक असल्याचे बोलले जाते. पालकमंत्र्यांशी चर्चा झाली असे आ. शेखर निकम यांनी दुरध्वनीवरून बोलताना सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आल्यास जिल्हयात पुर्णतः महायुती साकारेल. न.प. निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढली होती.

