मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आधीचं निवासस्थान म्हणजे कृष्णकुंज. त्यांनी कृष्णकुंज या आपल्या घराच्या बाजूलाच आणखी एक नवं घर उभारलं आहे. राज ठाकरे आपल्या कुटुंबीयांसोबत भाऊबिजेच्या शुभमुहूर्तावर आपल्या पाच मजली घरात राहायला गेले आहेत. हे घर सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. या घराचं पूजन राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
त्यांच्या नवीन घराचे नाव ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या. शिवतीर्थ असे त्यांच्या नवीन घराचे नाव असून, त्या घराच्या नामफलकाच अनावरण अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर राज ठाकरे यांनी नव्या घराची पाहणी केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरुन त्यांनी बंगल्याखाली जमलेल्या मनसैनिकांना अभिवादन केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. यामध्ये राज ठाकरे आज कुटुंबासह गृहप्रवेश केला आहे. राज ठाकरे यांनी नव्या शिवतीर्थ वास्तुवर भगवा झेंडा फडकवत प्रवेश केला. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शिवसेनेच आदराचं स्थान अर्थात शिवाजी पार्कातील शिवतीर्थ. आता राज ठाकरे यांनी आपल्या नवीन वास्तुचं नाव शिवतीर्थ ठेवल्यानंतर सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे.
कृष्णकुंज शेजारी बांधण्यात आलेल्या या पाच मजली इमारतीची रूपरेषा साधारण अशी असणार आहे. जे पाच माजले आहेत त्यापैकी पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली असून, याच इमारतीमध्ये मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे. याच ठिकाणी राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेतील, तसेच अन्य नागरिकांना देखील काही कामासाठी याच कार्यालयामध्ये राज ठाकरे यांना भेटता येणार आहे, अशी माहिती सध्या मिळाली आहे. आणि उर्वरित मजले राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या निवासासाठी वापरण्यात येणार आहेत.