मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात राजापूर शहरानजीक शीळ-कोंढेतड या दरम्यान अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम मार्गी लागले असून हा पुल एकेरी वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. या पुलामुळे राजापूरच्या मुळ निसर्ग सौंदर्यात भर पडली असून या पुलावरून मार्गक्रमण करताना आनंददायी सफरीचा वेगळाच अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. तर महामार्गावरील सर्वाधिक उंचीच्या या पुलामुळे राजापूरची एक नवीन ओळख राज्य आणि देशवासियांच्या समोर उलगडणार आहे.
नोव्हेंबर २०१८ मध्ये या पुलाच्या प्रत्यक्ष उभारणीला प्रारंभ झाला होता. मात्र भुसंपादनातील अडचणी आणि कोरोना काळात कामात आलेली शिथीलता यामुळे हा पुल मार्गी लागण्यास मे २०२२ साल उजाडले आहे. बांधकाम क्षेत्रातील प्रसिध्द अशा केसीसी बिल्डकॉन कंपनीमार्फत वाटुळ ते तळगांव या सुमारे ३३.५ किलोमीटर अंतराचे महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून या मार्गाचे काम आता अंतीम टप्यात आले आहे. वाटुळ ते तळगांव या दरम्यानच्या भागामध्ये लहान आणि मोठे असे मिळून एकूण १० पुलांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये वाटुळ व राजापूर येथे दोन मोठे पुल बांधण्यात आले आहेत.
अर्जुना नदीवर हा पुल २८० मीटर लांब व सुमारे ३० मीटर रूंदी व २७ मीटर उंच गडर पध्दतीने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारण्यात आला आहे. यासाठी शेकडो मजुर आणि तंत्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत होते. लवकरच या पुलाचा लोकार्पण सोहळा होणार असून यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांसह मान्यवर उपस्थितीत रहाणार आहेत. या पुलाला माजी राज्य मंत्री कै. भाईसाहेब हातणकर यांचे नाव द्यावे अशी मागणी पुढे येत आहे. एकूणच या पुलाने राजापूरच्या वैभवात भर घातली असून महामार्गावरिल सर्वाधिक उंचीचा पुल आमच्या राजापूरात आहे हि नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.