गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे कापणीयोग्य भातशेती आडवी झाली आहे. काही भागामध्ये जमिनीवर पडलेल्या भाताच्या रोपांच्या लोंब्यांमधील दाण्यांना नव्याने कोंब फुटू लागले आहेत. आज सकाळपासूनच पुन्हा पाऊस सुरू झाल्याने जमिनीवर आडवे झालेले पीक कापून घरात आणायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी वेळेमध्ये लावणीची कामे उरकली होती. त्यामुळे भातपिकही वेळेमध्ये परिपक्व होऊन कापणीयोग्य झाले आहे. शेतकऱ्यांनी गणेशोत्सवानंतर कापणीला सुरुवात केली आहे; मात्र गेले आठवडाभर कापणीच्या कामामध्ये पावसाचा व्यत्यय येत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश असूनही दिवसभरामध्ये कधीही पाऊस पडत आहे. त्यामुळे कापणीत अडथळे येत आहेत. बुधवारी (ता. ९) सायंकाळी पावसाने ढगांचा गडगडाट करत जोर धरला. त्यामुळे कापणी करून शेतामध्ये सुकण्यासाठी ठेवलेले भातपीक गोळा करण्याचीही उसंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. हे भात सुकवण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. पावसामुळे भातपीक आडवे झाले असून, काही भागामध्ये जमिनीवर पडलेल्या भाताच्या लोंब्यांना कोंब फुटले आहेत. याचे प्रमाण वाढल्यास जास्त नुकसान होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.