मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथे ३ नक्षलवादी आल्याची गाहिती देणाऱ्या एका व्यक्ती विरूद्ध मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत पोलीस हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधत आरोपीने ही खोटी माहिती त्याने दिल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या बाबत पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार, मौजे ‘दुधेरे आदिवासीवाडी येथून एका इसमानें पोलीस हेल्पलाईन नंबर ११२/१०० वर दूरध्वनी केला. पोलीस नियंत्रण कक्ष रत्नागिरी यांना मौजे दुधेरे आदिवासावीडी येथे ३ नक्षलवादी आले आहेत, त्यांच्याकडे विस्फोटक द्रव्य आहे, अशी माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून या विषयाबाबत मंडणगड पोलीस ठाणे येथे कॉल प्राप्त झाला. तत्त्काळ मंडणगड येथील पोलिसांनी दुधेरे आदिवासीवाडी येथे जाऊन खात्री केली असता फोन करणारी व्यक्ती पत्नी व मुलांसह सासूरवाडीत मौजे दुधैधेरे आदिवासीवाडी येथे सासऱ्यांच्या घरात रहात असल्याची माहिती उपलब्ध झाली. या घरातच नक्षलवादी असल्याचे व त्यांच्याकडे विस्फोटक द्रव्य ठेवल्याचे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते.
यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीच्या सासऱ्यांचे घर व घराबाहेरील परिसर तपासला असता पोलिसांना त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे, कुठलीही स्थिती आढळून आली नाही. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता असे काहीही घडले नसल्याचे लोकांनी सांगितले. दूरध्वनी करणाऱ्याच्या पत्नीकडे याविषयी चौकशी केली असता त्यांच्यामध्ये सतत वाद- विवाद होत असल्याची माहिती पत्नीने देताना पती दारु पिऊन पत्नी, मुलगा व पत्नीच्या घराच्यांना त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे या व्यक्तीने दारुच्या नशेत पोलीस हेल्पलाईन नंबरवर दूरध्वनी करुन दिलेली माहिती चुकीची व खोटी असल्याची पोलिसांची खात्री झाल्याने खोटी व चुकीची माहिती देवून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.