काल नितेश राणे यांचा जमीन नाकारल्यानंतर, कोर्टाच्या आवरामध्येच निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणेंपाठोपाठ आता निलेश राणेंच्याही अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीकरिता, शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना लेखी पत्र पाठवले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर न्यायालय परिसरात पोलिसांनी नितेश राणेंची गाडी थांबवली. त्यानंतर निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यामुळेच निलेश राणेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत वैभव नाईक यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना पत्र पाठवले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश असताना देखील निलेश राणे यांनी जिल्हा न्यायालयाबाहेर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच पोलिसांसोबत अरेरावीची भाषेत हुज्जत घातली. सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याबद्दल निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असं वैभव नाईक यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर दहा दिवसांची मुदत दिल्यामुळे राणेंना दहा दिवस कोठडी नाही, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. अशी माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. तर पोलिसांनी राणेंना अडवल्यावरून त्यांना विचारले असता ही पोलिसांची दादागिरी आहे. पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत नितेश राणेंना अटक करायची आहे, अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली आहे. पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला आहे, ते आम्ही सुप्रीम कोर्टात मांडू असेही राणेंचे वकील म्हणाले आहेत.
खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे कि, निलेश राणेंचे हे नेहमीचेच नाटक आहे, त्यामुळे मला त्यावर काही बालायचे नाही. पोलीस योग्य भूमिका घेऊन जे करणे आवश्यक आहे ते करतील. आत्ता खऱ्या अर्थाने नारायण राणेंना माहिती पडलं असेल देशातला कायदा नेमका काय आहे तो. यापूर्वी नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये मारा, ठोका आणि पळून जा अशा पद्धतीने सुरु होते. यामुळे कायद्याचे हात किती लांब पर्यंत जावू शकतात हे आता सिद्ध झाले आहे”.