तुतारीचा अखंड निनाद… वारकरी दिंडी… झाजपथक… पारंपरिक ढोल ताशे… तुतारीचे देखावे आणि फटाक्यांची आतषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून अथांग जनसमुदायाच्या साक्षीने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी बरोबर १ वाजता चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उद्योजक प्रशांत यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार रमेश कदम, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, राष्ट्रवादीचे निरीक्षक बबनराव कनावजे, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाला, दोनच दिवसांपूर्वी त्याची जाहीर घोषणा करून चिपळूण येथील तरुण उद्योंजक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव याना पक्षाकडून एबी फॉर्म देत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. प्रत्यक्षात या निवडणुकीसाठी प्रशांत यादव यांनी गेले ६ महिन्यांपासून तयारी सुरू केली होती.
१ वाजताचा मुहूर्त – महाविकास आघाडीतील सर्व स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन प्रशांत यादव यांनी गुरुवारी दिनांक २४ ऑक्टोबर दुपारी एक वाजताचा मुहूर्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडला होता. त्याअनुषंगाने तयारी देखील करण्यात आली होती. गुरुवारी सकाळीच प्रशांत यादव यांनी चिपळूण मधील देवीदेवतांचे सहकुटुंब दर्शन घेतले. तोपर्यंत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासम ोर गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. दुपारपर्यंत संपूर्ण परिसर खच्च गर्दीने भरून गेला. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर नतमस्तक होत प्रशांत यादव यांनी पुष्पहार अर्पण केला आणि महारॅलीला दणक्यात सुरुवात झाली.
प्रचंड जल्लोष – फुलांनी सजवलेली जीप त्यामध्ये उमेदवार प्रशांत यादव यांच्यासह नेते मंडळी आणि पुढे वारकरी दिंडी, टाळमृदुंगाचा गजर, तूतारिचा अखंड निनाद, झांजपथक आणि पारंपरिक ढोलताशे व प्रचंड घोषणाबाजी करत निघालेली अथांग रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती. चिंचनाका मार्गे रॅली चिपळूण नगरपरिषदेसमोर आली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुन्हा रॅली चिंचनाका येथे आली असता प्रशांत यादव थेट रस्त्यावर उतरले आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर चालत सर्वांना भेटत थेट पॉवर हाऊस येथे पोहचले येथून चिपळूण प्रांत कार्यालयात ते दाखल झाले.
घोषणांचा दणदणाट – यावेळी प्रांत कार्यालयासमोर प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. भगवे झेंडे, राष्ट्रवादीचे झेंडे, आरपीआयचे झेंडे आणि प्रशांत यादव आगे बढो च्या घोषणांनी संपूर्ण परिसर यावेळी दणाणून गेला होता. अफाट गर्दीतून मार्ग काढत प्रशांत यादव, माजी आमदार रमेश कदम प्रांत कार्यालयात दाखल झाले. येथे अगोदरच माजी मंत्री रवींद्र माने, जि.प. चे माजी अध्यक्ष रोहन बने उपस्थित होते. त्याचवेळी राजेंद्र महाडिक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा दाखल झाले आणि संपूर्ण क़ायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत प्रशांत यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण, सौ. चव्हाण, वैभव चव्हाण, सौ. स्वप्ना यादव देखील उपस्थित होते.
फटाक्यांची आतषबाजी – प्रशांत यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच फटाक्यांची प्रचंड आतषबाजी सुरू होती. तर तुतारीच्या निनादाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्ते देहभान हरपून नाचत होते. रखरखत्या उन्हात देखील जनसम दाय कायम होता. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रशांत थेट बाहेर आले, उपस्थित सर्वांना त्यांनी हात जोडून अभिवादन केले आणि प्रत्येकाची भेट घेत हे प्रेम कायम ठेवा असे आवाहन करत पुन्हा प्रांत कार्यालयात दाखल झाले. उर्वरित सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दुपारी ३ वाजता ते बाहेर पडले. बाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत पुन्हा प्रचंड घोषणाबाजी सुरू केली होती.