29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeRatnagiriनिरामय रुग्णालय शासनाच्या ताब्यात, कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन

निरामय रुग्णालय शासनाच्या ताब्यात, कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, शासनाने निरामय रुग्णालयाच्या इमारतीसह या परिसरातील अन्य इमारती ताब्यात घेतल्या आहेत.

नाम. उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी एनरॉनच्या निरामय हॉस्पिटलला भेट दिली होती त्यावेळी हे हॉस्पिटल शासन ताब्यात घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. आता हे निरामय हॉस्पिटल हे प्रशासनच्या ताब्यात आले असून त्याठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य विभागाने देखील या ठिकाणी चांगल्या पध्दतीने हॉस्पिटल उभारण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

शासनाने अधिग्रहीत केलेल्या निरामय रुग्णालय आणि जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात १०० खाटांचे कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर करण्याचे नियोजन आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग तर्फे या अधिग्रहीत इमारतींचे पर्यवक्षेण सुरु आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून शासनाने आधीपासून आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यास सुरवात केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, शासनाने निरामय रुग्णालयाच्या इमारतीसह या परिसरातील अन्य इमारती ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निवासासाठी असलेल्या १४ कॉटेज, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या १२ कॉटेज आणि नवोदय विद्यालय म्हणून वापरात येणारी संपूर्ण इमारत अधिग्रहित करण्यात आली आहे. जवाहर नवोदय विद्यालय बंद झाल्यानंतर ही इमारत महाराष्ट्र राज्य औद्यागिक विकास महामंडळाच्या ताब्यात होती.

यामधील निरामय रुग्णालयामध्ये केंद्रीय ऑक्सिजन प्रणाली आहे. रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष, तपासणी कक्ष अशी रचना आहे. त्यामुळे रुग्णालयाची इमारतीचा हा भाग डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी तर उर्वरित भाग कोविड केअर सेंटरसाठी वापरण्याचे नियोजन आहे.

या सर्व इमारती आणि वीज, पाणी आदी सुविधांची तपासणी सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरतर्फे सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखभाल दुरुस्तीसाठी किती खर्च येईल याचे अंदाजपत्रक बनविण्यास सांगितले आहे. याचीही कार्यवाही सुरु केली गेली आहे. सध्या तांत्रिकदृष्ट्या अधिग्रहीत इमारती ग्रामीण रुग्णालयाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. दुरुस्ती देखभालीची कामे झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय कोविडची तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेवून सदर इमारतींमध्ये पुढील कार्यवाही सुरु करणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular