काल दुपारी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. नितेश राणे यांच्या अंतरीम जामीन अर्जावर काल चार तास कोर्टात सुनावणी चालली. यावेळी सरकारी वकील आणि नितेश राणे यांच्या वकिला दरम्यानच चांगलाच युक्तिवाद रंगला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने अजून एक दिवस पुढे म्हणजे आज गुरुवारी यावर निर्णय देणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे नितेश राणे यांना काल दिलासा मिळू शकला नाही. तर, आज कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दोन्ही वकिलांच्या युक्तिवादामध्ये पोलीस महासंचालक सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय करतात असा सवाल राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केला असता, त्यावर पलटवार करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे तरी इथे काय करत आहेत ! असा प्रतिप्रश्न सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. दरम्यान, नितेश राणे प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या “नितेश राणे, कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख नाही” या वक्तव्यावर सिंधुदुर्ग पोलिसांनी नोटीस बजावली होती. तसेच दुपारी ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितलं होते. मात्र, राणे हजर न झाल्याने ही नोटीस नारायण राणे यांच्या घरावर चिटकविण्यात आली. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्राद्वारे मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही, तुम्ही व्हिसीद्वारे माझे उत्तर घेऊ शकता असे उत्तर दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून सुरु झालेल्या या वादाचे अनेक पडसाद उमटले. आज अखेर ते मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पॅनलसमोर महाविकास आघाडीने चांगलेच आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीने आता सगळ्या राज्याचं लक्ष वेधले आहे. कुणीही कितीही गमज्या मारल्या तरी या निवडणुकीत आपलेच पॅनल विजयी होणार, असा विश्वास राणे गटाला आहे. या संघर्षात कोण बाजी मारते त्याचा निकाल ३१ डिसेंबरला लागणार आहे.

