सिंधुदूर्गमध्ये सागररत्न मत्स्य बाजारपेठचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते दिपक केसरकर, विनायक राऊत त्याचप्रमाणे बीजेपीचे आम. नितेश राणे उपस्थित होते. त्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात आणि कोकणात जोरदार चर्चा होत आहे. सदर कार्यक्रमाला शिवसेना नेते उपस्थित असताना, त्यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
व्यासपीठावर बोलताना नितेश राणे म्हणाले कि, सिंधुदूर्ग जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र काम करण्याची वेळ आली आणि आमच्या पक्ष श्रेष्टींचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु. आम. नितेश राणे यांचे हे असे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे युतीला पाठींबा देण्यासारखे असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आजूबाजूच्या परिसरातील गझालीमध्ये फक्त एकच विषय चर्चिला जात आहे.
बाळासाहेबांची शिवसेना आणि नारायण राणे यांच्या असलेल्या अतूट नात्याबद्दल सर्वज्ञात आहे. त्यानंतर अनेक पक्ष बदल झाले, अनेक घडामोडी घडल्या, परंतु राणे पिता-पुत्रांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर मात्र शिवसेनेसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर कायमच बोचरी टीका टिपण्णी करण्यात येत असे. त्यांना प्रत्युत्तर सुद्धा त्याचप्रमाणे मिळत असे.
काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरु होती, पण नंतर ती काही दिवसाने बंद झाली. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने बीजेपी आणि शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने युतीचे चाहते नक्कीच सुखावले आहेतआणि आम. नितेश राणेंनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे नक्कीच काहीतरी संभाव्य घडण्याची कुजबुज सुरु आहे.