रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कमळ फुलल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला भाजप लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ‘मी विधानसभेत दिसणार’ असे सांगत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे जाहीर न केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना पेव फुटले आहे. ते त्यांचे वडिल खा. नारायण राणे यांनी अनेक वर्ष ज्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले त्याच मतदारसंघातून निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरू आहे.
निलेश राणेंनी मात्र मतदारसंघाचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. रत्नागिरी दौऱ्यावर आले असता माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणूक लढवणारच असे त्यांनी सांगितले. मात्र कोणत्या मतदारसंघातून ते लढणार हे अजूनही स्पष्ट केलेले नाही. निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार आहेत. ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून एकदा विजयी झाले आहेत. आता ते विधानसभेची तयारी… करत आहेत.
कुडाळमधून लढणार? – ते कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत, अशी चर्चा गेले अनेक दिवस राजकीय वर्तुळात सुरू आहे. विद्यमान परिस्थितीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या (शिंदे गट) यांच्या कोट्यात आहे. कारण’ शिवसेनेत फूट पडण्यापुर्वी या मतदारसंघातून अखंडीत शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक हे निवडून आले होते. शिवसेना-भाजप महायुतीच्या जागावाटपात त्यामुळे हा मतदारसंघ शिंदे गटाकडे राहील, असे संकेत मि ळत आहेत.
भाजपला मिळेल ? – भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र जागा वाटपातं तो भाजपसाठी सुटेल का? हा खरा प्रश्न आहे. लोकसभेला शिवसेना शिंदे गटाने आपल्या कोट्यातली जागा नारायण राणे यांच्यासाठी सोडलीः त्यानंतर कुडाळ-मालवणचीही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राणेंसाठी सोडणार का? यावर निलेश राणे यांचे भवितव्य अवलंबून आहे. जर ही जागा शिंदेंनी सोडली नाही तर निलेश राणे यांना पर्यायी मतदारसंघ शोधावा लागणार आहे.
निलेश राणेंना विश्वास – मात्र असे असले तरी माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी शंभर टक्के विधानसभेत जाणार असे वक्तव्य केले आहे. निलेश राणे यांना जर उमेदवारी मिळणार असेल तर ती भाजपची असेल की शिवसेना शिंदे गटाची? अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. निलेश राणेंनी आपण विधानसभा लढविणार असे सांगितले असले तरी ते कोणत्या मतदारसंघातून लढणार हे स्पष्ट केलेले नाही. त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही त्यांनी सांगितले. सध्याची सिंधुदुर्गची स्थिती पाहता इथे ३ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातला एक भाजपच्या ताब्यात तर एक शिंदे शिवसेनेकडे तर एक ठाकरे सेनेकडे आहे.. त्यामुळे निलेश राणे कोणत्या मतदारसंघातून लढतात याविषयी अंदाज बांधले जात असून वडिलांचा कुडाळ-मालवण हा मतदारसंघ ते निवडतात का? याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.