केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि भाजपचे आम. नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. सुप्रीम कोर्टाने संतोष परब जीवघेणा हल्ला प्रकरणी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे, तसेच पुढील १० दिवस अटकेपासून संरक्षण दिले आहे. नितेश राणेना येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित जामीन घ्या, असं सुप्रीम कोर्टानं सुनावलं आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे.
तसेच येत्या दहा दिवसांसाठी नितेश राणे यांना अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. त्यामुळे आता कनिष्ठ कोर्टात नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच राणेंच्या वकिलांनी नितेश राणेंवरील आरोप खोटे असून निव्वळ राजकीय सुडापोटी करण्यात आलेले हे आरोप असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांच्या समोर नितेश राणे यांच्यावरील अटक पूर्व जामीन अर्जाची सुनावणी झाली. नितेश राणे यांच्या वतीने मुकूल रोहतगी तर राज्य सरकारच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार आपापल्या बाजू मांडल्या. कोर्टामध्ये दोन्ही बाजूनं जोरादर युक्तिवाद करण्यात आला.
सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीनंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सोशल मिडीयावर राणेंना खोचकपणे ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी “लघु सुक्ष्म दिलासा !” असं ट्विट करून एक प्रकारे राणेंना डिवचलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुध्द राणे असा संघर्ष उफाळणार अशी चिन्ह निर्माण होऊ शकतात. याआधीच नारायण राणे यांनीही शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर अनेकदा टिका टिपण्णी केली होती.

