रत्नागिरीत मिरकरवाडा परिसरातील मच्छिमार प्राधिकरणाच्या जागेवर झालेले अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देणारे राज्याचे मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांच्या कौतुकाचे बॅनर रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांनी लावले होते. यापैकी एक बॅनर गुरुवारी सायंकाळी अज्ञाताकडून काढण्यात आला. यावेळी संतप्त झालेले भाजपा कार्यकर्ते पोलीस ठाण्यावर जावून थडकले. बॅनर काढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. रत्नागिरी मिरकरवाडा बंदर नजीक मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. मागच्या आठवड्यात रत्नागिरी दौऱ्यावर आलेले राज्याचे मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री मितेश राणे यांनी तातडीने सर्व अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्याचे आदेश बजावले होते. त्यानुसार कारवाईही सुरु झाली.
सर्व विरोध मोडून ही कारवाई करण्यात आली. ना. नितेश राणे यांच्या बेधडक कारवाईचे कौतुक करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत दोन ठिकाणी बॅनर लावून त्यांचे अभिनंदन केले. बुधवारी सायंकाळी यापैकी एका बॅनर काढण्यात आला. या प्रकाराने भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले. सुमारे ५० ते ६० कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यावर जावून धडकले. ज्याने कोणी हे कृत्य केले आहे त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी करत या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. अखेर पोलिसांनी चौकश व कारवाईचे आश्वासन दिले.