काल अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. अनेक पक्षांचे त्यामध्ये मनसुबे धुळीला मिळाले. शिवसेनेने गोवा आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती. मात्र, या दोन्हीही राज्यांमध्ये शिवसेनेचा दारूण पराभव झाला आहे. युपी, पंजाब मध्ये शिवसेना जिंकून येणार अशी ग्वाही खास. संजय राउत यांनी दिली होती. पण यूपीच काय तर किमान महाराष्ट्राच्या शेजारील गोव्यामध्येही शिवसेनेला आपली जागा निर्माण करण्यास अपयश आलं आहे.
गोव्यामध्ये संजय राऊत यांनी चांगलीच मेहनत घेतली होती. पण तरीही गोव्यामध्ये शिवसेनेला काही कमाल दाखवता आलेली नाही. यंदाच्या निवडणुकीत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. पण आदित्य ठाकरेंच्या सभेला गर्दी झाली, तेवढीच मतंही पक्षाला मिळाली.
गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला मोठा दणका बसला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही अल्प मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला ०.२५% मते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास १.०६% मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी दिसून येत आहेत. १.१७% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला असल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे.
शिवसेनेला नोटा पेक्षा कमी मतं पडली, या साऱ्या निकालावर नितेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. यावर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांनी म्हटलंय की, गोवा आणि यूपीमध्ये ‘म्यँव म्यँव’चा आवाज ऐकू आला नाही. खूपच दु:खद… अत्यंत दु:ख झालं हे.