25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeChiplunनीलिमा चव्हाणच्या मृत्यूमागे घातपात नाही...

नीलिमा चव्हाणच्या मृत्यूमागे घातपात नाही…

पोस्टमार्टमनंतर व्हिसेरा अहवाल येणे बाकी आहे. येत्या ४ दिवसात हा अहवाल येईल आणि त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

चिपळुणातील ओमळी गावची सुकन्या कु. निलिमा चव्हाणच्या मृत्यूचे गूढ पूर्णतः उलगडले नसले तरी पोलिसांच्या हाती बरीच माहिती लागली आहे. निलिमाचा घातपात झाल्याचा नातेवाईकांचा दावा असला तरी आजवरच्या तपासाच्या अनुषंगाने हा घातपात नसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. पोस्टमार्टमनंतर व्हिसेरा अहवाल येणे बाकी आहे. येत्या ४ दिवसात हा अहवाल येईल आणि त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. दरम्यान, निलिमा चव्हाणच्या नातेवाईकांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत व्हावा, अशी मागणी केली आहे.

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून सामाजिक संघटनांसह नाभिक समाजबांधवांची संघटनादेखील आता आक्रमक झाली आहे. रत्नागिरी पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी मोठा फौजफाटा तपासकामात उतरवला आहे. मंगळवारी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन आजवर झालेल्या तपासावरून घातपात नसल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे, असे सांगताना हा प्राथमिक अंदाज असला तरी सर्व गोष्टी पडताळून हा तपास पुढे चालू राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

येण्याजाण्याचे मार्ग तपासले – निलिमा चव्हाण ही मूळची चिपळूण तालुक्यातील ओमळी गावची राहणारी होती. ती आपल्या मैत्रिणींसोबत दापोलीत रूम घेऊन राहत होती. बँकेत ती नोकरी करत होती. निलिमाचे येण्याजाण्याचे मार्ग कोणते होते याची माहिती घेऊन ते सर्व मार्ग पोलिसांनी तपासले. त्या म र्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजदेखील. तपासल्याची माहितीदेखील पोलीस अधीक्षकांनी दिली.

अंगावर जखमा नाहीत – निलिमाचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या अंगावर जखमा आहेत, तिच्या डोकीवरचे केसवपन करण्यात आले होते असे आरोप करण्यात आले. राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनातदेखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात अशा जखमा आढळून आल्या नसल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

केईएम हॉस्पिटलची मदत – निलिमाचा मृतदेह डोकीवर केस नसल्याच्या अवस्थेत मिळून आल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. यासंदर्भात केईएम हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागाची मदत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीवरुन असे समजते की, पाण्यात पडून ७२ तास झाल्याने मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातूनच डोकीवरचे केस गेले असे मत केईएमच्या तज्ञांनी नोंदवले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भरणेनाक्यात उतरली – ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी निलिमा खेड बसस्थानकात आली होती. त्या ठिकाणी तिला मैत्रिण भेटली. दोघींमध्ये गप्पा झाल्या. मैत्रिणही चिपळूणला जाणार होती. मात्र तिची बहिण सोबत असल्याने ती रेल्वे स्थानकाकडे निघून गेली आणि निलिमा चिपळूणकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली व भरणे नाका येथे उतरली, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

बॅगेबाबत तपास सुरू – निलिमाच्या खांद्याला तिची बॅग होती. मात्र ज्याने ती बॅग उचलली होती ती त्याने भीतीपोटी पुन्हा जगबुडीच्या पात्रात फेकून दिली. या बॅगेचा शोध घेण्यासाठी ८० कर्मचारी दोन दिवस जगबुडी ते दाभोळ खाडी असे सर्च ऑपरेशन करीत आहेत. अद्याप बॅग पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

पिंपळाखाली बॅग – ज्यावेळी निलिमा भरणे पुलाकडे आली त्यावेळी एका व्यक्तीने तिला पाहिले होते. ती व्यक्ती भरणे नाक्याकडे निघून गेली. त्यानंतर त्याच मार्गाने येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला ती बॅग दिसली. त्याने ती बॅग उघडून पाहिली त्यावेळी एका रिक्षा चालकाने त्याला हटकले होते. त्यानंतर ती बॅग तिथेच ठेवून तो भरणे नाक्याकडे निघून गेला व हा प्रकार पहिल्या साक्षीदाराला सांगितला, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

बॅग घरी नेली – आपल्या पाठिमागून आलेल्या मित्राने बॅगेबाबत माहिती दिल्यानंतर दोघेही त्या ठिकाणी गेले व बॅग घेऊन ते आपल्या घरी निघून गेले. घरातील व्यक्तींनी त्यांना बॅग का आणली याबाबत विचारले व हा प्रकार चुकीचा आहे असे सांगितले. या दोघांनाही व्यसनाची सवय होती असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

पर्समध्ये फक्त ११ रूपये – पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी पुढे म्हणाले की, ज्या साक्षीदाराने ही बॅग घरी नेली त्याने बॅगेचा पहिला कप्पा उघडला असता बॅगेमध्ये तिचे आधारकार्ड व एक छोटी पर्स मिळून आली. त्या पर्समध्ये फक्त ११ रूपये असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

एस्. टी. वाहकाचे रेकॉर्ड तपासले – घटनेच्या दिवशी नीलिमा खेड बसस्थानकातून चिपळूणला जाण्यासाठी ज्या बसमध्ये बसली होती त्या बसच्या वाहकाचे रेकॉर्ड पोलिसांनी तपासले आहे. एक महिला भरणे नाका येथे उतरल्याचे रेकॉर्डमध्ये नमूद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच भरणे नाका येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती ब्रिजकडे जाताना दिसून येत असल्याचेही डीएसपींनी पत्रकार परिषदेत सांगितले.

व्हिसेराकडे लक्ष – या प्रकरणात पोस्टमार्टेम अहवाल घातपात नसल्याचे स्पष्ट करीत असल्याने व्हिसेरा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे. चार दिवसात त्याचा अहवाल अपेक्षित असून या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular