रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या गावामध्ये औद्योगिक क्षेत्र (एम आयडीसी) विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून गावकऱ्यांचा त्याला विरोध आहे. सडामिऱ्या ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामसभेत एकमुखाने या औद्योगिक क्षेत्राला विरोध दर्शविला आहे. तशा आशयाचा ठराव या ग्रामसभेत संमत झाल्याचे सरपंच सौ. सायली सावंत यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. याबाबत मिऱ्या येथील ज्येष्ठ ग्रामस्थ प्रशांत सावंत यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की गावात औद्योगिक क्षेत्र जाहीर झाल्याने संताप व्यक्त होतो आहे. या विरोधात सारे ग्रामस्थ एकत्र आले आहेत.
सडामिऱ्या गावची ग्रामसभा सरपंच सौ. सायली सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बोलावण्यात आली होती. मोठ्या संख्येने ग्रामस्थ या सभेला उपस्थित होते. सर्वांनीच एमआयडीसीला आपला विरोध असल्याचे ठामपणे सांगितले. त्याचप्रमाणे ग्रामसभेने एकमताने ठराव मंजूर केला असे सरपंच सौ. सायली सावंत यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. हे औद्योगिक क्षेत्र तातडीने रद्द करावे अशी मागणी देखील गावकऱ्यांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ महेश सावंत, प्रशांत सावंत, वसंत सावंत, प्रवीण सावंत, बाळू सावंत यांनी आपली मते मांडली.
गावात अनेकांची आंब्याची झाडे आहेत. काजूच्या बागा आहेत. विपुल अशी निसर्गसंपदा गावाला लाभलेली आहे. अशा या गावात औद्योगिक क्षेत्र विकसित करुन कोणता नवा विकास केला जाणार आहे? असा सवाल गावकऱ्यांनी केला. यामुळे औद्योगिक क्षेत्राला आमचा तीव्र विरोध आहे अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. दरम्यान आता मिऱ्या औद्योगिक क्षेत्राला विरोध वाढू लागला आहे.