रत्नागिरी पालिकेकडे १ जानेवारी २०१५ ते १ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये १ हजार २५१ विवाह नोंदी झालेल्या आहेत. धर्मनिहाय किंवा जातनिहाय झालेल्या विवाह नोंदणीची माहिती मागवली असता रत्नागिरी पालिकेत नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन सुविधा नाही. विवाह नोंदणीसाठी आठवड्यातील मंगळवार आणि गुरुवार हे दोनच वार दिलेले आहेत. त्यामुळे सुटीच्या दिवशीही विवाह नोंदणीची सुविधा चालू ठेवावी, अशी मागणी समाजिक कार्यकर्ते आणि अॅड. अमेय परूळेकर यांनी केली आहे. प्रत्येक महिन्यात प्रत्येक धर्माच्या वधू-वरांची किती विवाह नोंदणी झाली, याची माहिती परूळेकर यांनी मागितली होती. प्रत्येक महिन्यात किती विवाह नोंदणी झाली व प्रत्येक महिन्यात कुठल्या धर्माच्या वधू-वरांचे विवाह झाले, ज्यामध्ये एका लग्नातील वधू आणि वर वेगवेगळ्या धर्माचे होते त्याची माहिती द्यावी, असे त्यांनी पत्र दिले होते. परूळेकर यांच्या मागणीनुसार, पालिकेने हिंदू विवाहांच्या नोंदणी ८७५, मुस्लिम विवाहांच्या नोंदणी ३५२ आणि बौद्ध विवाहांच्या नोंदणी २४ अशा एकूण १२५१ विवाह नोंदणी झाल्याची माहिती दिली; परंतु आंतरधर्मीय विवाह नोंदणीची आकडेवारी रत्नागिरी पालिकेकडे नाही.
त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात किती विवाह नोंदी झाल्या याबाबत सविस्तर माहिती उपल्बध नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले, असे परूळेकर यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी शहरांमध्ये बऱ्याच वेळेला सुटीच्या दिवशीसुद्धा विवाह होतात. त्याचप्रमाणे शासकीय नोकरदार वर्ग किंवा मंगळवार आणि गुरुवार या दोन दिवशी विवाह नोंदणीसाठी रत्नागिरी पालिकेमध्ये ज्या लोकांना यायला शक्य नाही त्या लोकांसाठी शनिवार, रविवार असे सुटीच्या दिवशी सुद्धा विवाह नोंदणीची सुविधा उपलब्ध झाल्यास ते योग्य ठरेल. वाटल्यास त्यासाठी आलटून पालटून कर्मचाऱ्यांची नेमणूक करता येऊ शकते. त्याचप्रमाणे घरपोच विवाह नोंदणीची सेवासुद्धा प्रायोगिक तत्त्वावर चालू करता येईल का, याचा देखील अभ्यास रत्नागिरी पालिकेने करावा, अशी मागणी परूळेकर यांनी केली आहे.
प्रमाणपत्रही मिळते उशिरा – विवाह नोंदणीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत व्हावी यासाठी ऑनलाइन फॉर्म सुविधा चालू करण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे अर्जाचे पैसेही ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याची सुविधा चालू करावी. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचू शकतो. पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा देखील वेळ वाचू शकतो, असे परूळेकर यांनी म्हटले आहे. तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्रही उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात सुधारणा करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.