राजापूरवासियांची गेली अनेक वर्षे राजापूर रोड रेल्वेस्थानकावर जनशताब्दीसहीत अन्य सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी असतानाही कोकण रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील प्रवाशांनी केला आहे. त्याचवेळी खेड, संगमेश्वर स्थानकात ३ एक्स्प्रेसना प्रायोगिक तत्वावर थांबे मंजुर केले आहेत. कोकण रेल्वे प्रशासन यामुळे पुन्हा एकदा राजापूरवासियांबाबत उदासिन धोरण राबवित असल्याचे आरोप होत असून आता तरी राजापूरवासिय जनआंदोलन उभारणार का? असा प्रश्न काही जेष्ठ नागरीकांनी उपस्थित केला आहे. राजापूर रेल्वेस्टेशन जरी राजापूर शहरापासून दूर असले तरी आज कोकण रेल्वे प्रशासनाच्या माहीतीनुसार अपेक्षित उत्पन्न देणारे स्थानक आहे.
असे असतानाही कोकण रेल्वे मार्गावरील अनेक सुपरफास्ट रेल्वेंना थांबे दिलेले नाहीत. शिवाय या ठिकाणी सुविधांचा अभाव असून येथील ग्रामस्थांनी परिस्थिती दाखवूनसुध्दा यामध्ये सुधारणा करण्यात आलेली नाही. या परिसरातील पंचक्रोशी समितीने तर बेलापूर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देत परिस्थितीची जाणीव करून दिली. तसेच अन्य सुपरफास्ट गाडयांना थांबे मिळावेत म्हणून मागणी केली. शिवाय यापुर्वी राजापूरच्या नागरीकांनी जनशताब्दीला थांबा मिळावा म्हणून आंदोलनही छेडले असा असतानाही कोकण रेल्वे प्रशासन राजापूरच्या मागणीना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
दुसरीकडे मात्र जनतेच्या मागणीवरुन खेड, संगमेश्वर स्थानकात ३ एक्स्प्रेसना प्रायोगिक तत्वावर थांबे मंजुर केले आहेत असा दुजाभाव का? असा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे. कोरे मार्गावर राजापूर एकमेव स्थानक राजापूर तालुकावासीयांसाठी आहे. या स्थानकावर कोकणकन्या, मडिवीसह राज्यराणी या तीन एक्स्प्रेससह सावंतवाडी – दिवा ही पॅसेंजर एक्स्प्रेस गाडी थांबते. शिवाय हंगामी असणाऱ्या काही फेऱ्या थांबविल्या जात आहे. तालुक्याच्या दृष्टीने एकमेव व तेवढेच महत्वाचे असणाऱ्या स्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेसला थांबा मिळावा म्हणुन मागील काही वर्षे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. संबंधीत मंत्री यांच्यासह वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटुन जनशताब्दीच्या म गिणीबाबतची निवेदने देण्यात आली होती. मात्र प्रशासनाने त्याला अजिबात दाद दिली नाही. यामुळे राजापुरात संताप व्यक्त होत आहे.