नुकत्याच स्थापन झालेल्या कोकण प्रादेशिक पक्षाने आगामी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रसिद्ध उद्योजक शकील सावंत यांची उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक सदस्य आणि प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. ओवेस पेचकर यांनी ही घोषणा येथे पत्रकार परिषदेत केली. कोकणच्या विकासाकडे आजवरच्या राज्यकर्त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले असा आरोप करत कोकणच्या सर्वांगिण विकासाकरीता कोकण प्रादेशिक पक्षाची स्थापना करण्यात आल्याचे अॅड. पेचकर यांनी सांगितले. रत्नागिरीतील प्रसिद्ध हॉटेल सावंत पॅलेसमध्ये अॅड. ओवेस पेचकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कोकण प्रादेशिक पक्षाची ध्येय्य धोरणे सांगितली.
कोकणचा सर्वांगिण विकास हाच प्रमुख मुद्दा असेल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा महिला संयोजकपदी अॅड. सखी सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले. महाराष्ट्राच्या विकासाच्या तुलनेत कोकणला सर्वच बाबतीत मागे ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, रत्नागिरीतील लांजा, चिपळूण आणि रत्नागिरी बस स्थानकाचे रखडलेले काम ही त्याची प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. कोकणच्या प्रश्नांसाठी आजवर मी स्वतः कायदेशीर लढाई लढलो आणि लढणारही आहे. पण राजकीय पाठबळ असल्याखेरीज सामान्य जनतेची प्रश्न सुटणार नाहीत यासाठी पक्षाची स्थापना केल्याचे अॅड. पेचकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोकणच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून अनेक कामं होऊ शकतात. पर्यटक वाढण्यासाठी अनेक सोईसुविधा निर्माण केल्या पाहिजेत. गड किल्ल्यांचे जतन केले पाहिजे असेदेखील त्यांनी सांगितले. कोकण प्रादेशिक पक्ष हा मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग अशा ७ जिल्ह्यात कार्यरत राहिल. पक्षात अनेक सुसंस्कृत आणि सुविद्य व्यक्तींचा समावेश आहे. अनेक तरुणांना पक्षाच्या माध्यमातून व्यासपिठ मिळेल असेही ते अॅड. पेचकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
समोर कोणताही उमेदवार असो आम्ही लढणार. कोकणातील जनता आणि कोकण, प्रादेशिक पक्ष यांचे गठबंधन असेल. कोकणच्या प्रश्नांसाठी आम्ही लढु असे सांगताना त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध उद्योजक हॉटेल सावंत पॅलेसचे मालक शकील सावंत यांची उमेदवारी घोषीत केली. त्यांनी देखील कोकणच्या विकासासाठी आपण राजकारणात प्रवेश करत असून कोकणच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली पाहिजे, तरुणांना रोजगार दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कोकण प्रादेशिक पक्षाचे पदाधिकारी अॅड. वैभव हळबे, नावेद मुल्ला हेदेखील उपस्थित होते.