रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आ. राजन साळवी यांची रत्नागिरी येथील जिल्हा कार्यालयात भेट घेऊन, गेली २० वर्षे विनाअनुदानित शिक्षक व कर्मचारी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा करण्यात आली. २००० सालापासून शिक्षक आणि शिक्षकेत्तर भरतीच झालेली नाही. अनेक बी.एड, डी.एड, बीपीएड पास होऊन झालेले शिक्षणसेवक एकतर तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत, नाहीतर बेरोजगार आहेत. अजूनही शिक्षकी पेशाची नोकरी मिळेल या आशेवर अजूनही हजारो शिक्षक अवलंबून आहेत. पण शासनाची भरती अजून झालेली नाही. शिक्षक पात्रता चाचणी उत्तीर्ण होऊनसुद्धा, अनेक शिक्षणसेवक केवळ भरतीच्या आशेवर आहेत.
राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आ. राजन साळवी यांनी, रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाला असे आश्वासन दिले आहे कि, गेली २० वर्षे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचारी यांना प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळावे, यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे ठाम आश्वासन दिले.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये अघोषित शाळा निधीसह घोषित करून प्रचलित धोरणानुसार अनुदान सुरू करणे, विनाअनुदानित शाळेतील सर्व कर्मचारी यांना सेवा संरक्षण देणे, त्रुटी पूर्तता शाळांचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करून वाढीव टप्पा देणे, वैद्यकीय बील प्रती पूर्ती सेवा सुरू करणे आदी मागण्यांबाबत शासन दरबारी प्रयत्न करून न्याय देण्यासाठी आग्रही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.