एसटी कर्मचाऱ्याचा दोन महिन्यांपासून बेमुदत संप सुरु असलेला संप अजूनही संपुष्टात आलेला नाही. विलीनीकरणाच्या मागणीसाठी अजूनही रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात २ महिने होऊन गेले तरी कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटी आर्थिक तोट्यात गेली आहे. शासनाने कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण सोडून, मूळ वेतनात वाढ या मागण्या मान्य केल्या आहेत. पण तरीही कर्मचारी आपल्या मागणीवरून संप मागे घ्यायला तयार नाहीत.
संपावर ठाम राहिलेले आणि गैरहजर एसटी कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले जाणार नाही याची स्पष्टता परिवहन मंत्री अनिल परब यांनी आधीच केली होती. त्याप्रमाणे आता जे कर्मचारी कामावर हजर झाले त्यांना पगार वाढीसह वेतन मिळण्यास सुरुवात झाली. परंतु, जे कर्मचारी अजूनही हजर झाले नाहीत त्याचे यावेळचे धरून दुसऱ्यांदा वेतन करण्यात आले नाही आहे.
आज, शुक्रवारी ७ जानेवारीला एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नवे वेतन जमा होईल. मात्र केवळ डेपोमध्ये उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनाच वेतन मिळणार असून, संपात सामील असलेल्या कर्मचाऱ्यांना सलग दुसऱ्यांदा वेतन मिळणार नाही. एकूण संपामध्ये सहभागी झालेल्या ८८ हजार ३४७ कर्मचाऱ्यांपैकी निलंबित, बडतर्फ, सेवासमाप्ती केलेले कर्मचारी आणि संपात सध्या सामील असलेल्या ६३ हजार ७०७ कर्मचाऱ्यांना नव्या वेतनावर पाणी सोडावे लागणार आहे. केवळ २४ हजार ६४० कर्मचारी कर्तव्यावरच हजर झाले आहेत.
निलंबित कर्मचारी ११ हजार २४ असून बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ५१३ आहे, तर बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेले कर्मचारीही ३,५९३ आहेत. याशिवाय रोजंदारीवरील सेवासमाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचीही संख्या सुमारे दोन हजारच्या आसपास आहे.