पावसाळा तोंडावर आल्याने दापोली तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाची बैठक तहसील कार्यालयात झाली. बैठकीत सर्व प्रशासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांना अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या व आपत्तीच्या अनुषंगाने सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच धोकादायक स्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणांवरील नागरिकांना स्थलांतराबाबत देखील नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दापोलीचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार अर्चना बोंबे यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाच्या दोन बैठका झाल्या. या बैठकांमध्ये विजेच्या तारा, धोकादायक स्थितीत असणारे खांब यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना महावितरणला देण्यात आल्या.
बांधकाम विभागालाही रस्त्यावरील धोकादायक झाडे तोडण्याबाबत तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बंधारे भरल्यानंतर त्या ठिकाणी पर्यटक जातात. अशावेळी कोणती आपत्ती होऊ नये यासाठी त्या त्या खात्यांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून आपत्तीकक्षाची निर्मिती केली आहे. गावागावात ग्रामपंचायती देखील आपत्तीच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या असून, प्रत्येक खात्याकडून कर्मचाऱ्यांची पथके तयार केल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.
बैठकीला सर्व खात्यांचे प्रमुख व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. धोकादायक स्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणांच्या स्थलांतराबाबत देखील नोटीस बजावण्यात येणार आहेत. या नोटीस बजावण्याचे काम लवकरच पूर्ण करावे, असे सांगण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाबाबत नगरपंचायतीला देखील सूचना देण्यात आल्या तसेच कार्यालयाकडून आपत्तीच्या कामासाठी दिवस व रात्रीसाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.