कर्जदारांची पिळवणूक करून जुलमी कर्ज वसूली करणाऱ्या सावकारांना दुसरा झटका बसणार आहे. पोलिसांकडून कारवाई झालेल्या २ सावकारांना जिल्हा उपनिबंधक कार्यालाने नोटीस बजावली असून त्यांची सखोल चौकशी होणार आहे. सावकारांकडून बेकायदेशीर कर्ज वसुली केली जात असले तर कर्जच भरु नका, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांनी केले आहे. कर्जदारांना हा एक मोठा दिलासा आहे. सावकारी पाश जिल्ह्यावर किती घट्ट आहे हे रत्नागिरी, चिपळूणात बेकायदेर सावकारीविरुद्ध झालेल्या कारवाईवरून पुढे आले आहे. शासकीय सेवेत असताना एक कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडला आणि सावकाराने त्याची पिळवणूक सुरू केली.
तेव्हा हा प्रकार पुढे आला. दीड लाखाचे कर्ज कधी ४० लाखावर गेले हे त्यालाच कळले नाही. त्यानंतर दुसऱ्या सावकाराने कर्जदाराची दुचाकी उचलून आणली. काहींच्या मालमत्तेला टाळे ठोकले, असे प्रकार पुढे आल्यानंतर एक एक करत ६ ते ७ प्रकरणे पुढे आली. काहींनी तर सावकरांच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. काही सावकारांनी नोटरी करून कर्जदाराची मालमत्ता नावावर करून घेतली आहे, असे अनेक गंभीर प्रकार उघडकी आले आहेत.
अनेक कर्जदारांची वाहने, ब्लॉक, जागा नावावर सावकारांनी करून घेतली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झाली. याबाबत जिल्हा उपनिबंधकांना विचारणा केली असता संशयित आरोपी निलेश कीर आणि अरुण बेग हे नोंदणीकृत सावकार असून त्यांच्याविरुद्ध तक्रारी आहेत. म्हणून त्यांना नोटीस बजावली असून २३ तारखेला चौकशी होणार आहे. नोंदणीकृत सावकार मुद्दलापेक्षा जास्त कर्ज वसूल करू शकत नाहीत. तर बेकायदेशीर सावकार बेकायदेशीर कर्ज वसुली करू शकत नाही. त्यामुळे बेकायदेशीर कर्ज वसुली होत असेल तर कर्जदारांनी कर्ज भरू नये, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. कर्जदारांना हा एक मोठा दिलासा आहे.