सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना म्हटले की, तुम्ही स्वत:ला वकील म्हणता, तरीही तुम्ही असे कोणत्याही धर्माबद्दल बेजबाबदार विधान कसे केले ? तुमच्या अशा वक्तव्यामुळे देशातील वातावरण पूर्णपणे बिघडून गेले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशाची बदनामी झाली आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माची याचिका फेटाळून लावली. याप्रकरणी तुम्ही उच्च न्यायालयात जा, असे न्यायालयाने सांगितले. नुपूर शर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध विविध राज्यांत दाखल झालेले सर्व खटले दिल्लीला हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला होता.
ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगासंदर्भात एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्माने पै.मोहम्मद यांच्यावर कथितपणे वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. यानंतर भाजपने राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हकालपट्टी केली होती. इतकेच नाही तर पक्षाच्या दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.
नुपूर शर्मा यांनी आधीच माफी मागितली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माच्या आधीच्या माफीबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. तुमची माफीही सशर्त असल्याचे न्यायालयाने सांगितले. दिल्ली पोलिसांनी राजधानीत दाखल केलेल्या तक्रारीवर आतापर्यंत केलेल्या कारवाईवरही सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळे उदयपूरची घटना घडल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तुम्हाला असे वक्तव्य करण्याची काय गरज होती, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला होता.
प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण बिघडले आहे, असे सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना सुनावले. तुम्ही टीव्हीवर जाऊन माफी मागावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.