राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नातून रत्नागिरीत वाटद एमआयडीसी क्षेत्रात शस्त्र बनविण्याचा कारखाना उभारण्यात येणार आहे. ‘अंबानी डिफेन्स’ या नावाने सुरू होणाऱ्या या कारखान्याला वाटद आणि परिसरातील काही गावांतील लोकांनी विरोध दर्शविला आहे. तर काही जणांनी उद्योगासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा दर जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील वाटदमध्ये एमआयडीसीमार्फत काही उद्योग सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत परिसरातील जनतेची भूमिका जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वैयक्तिक आक्षेप नोंदविण्यास सांगितले होते. वाटद, खंडाळा, कंळझोंडी, जयगड, रीळ आदी अनेक गावांतील नागरिकांनी त्यांचे आक्षेप नोंदविले असून ४ जुलैपासून या आक्षेपांवर रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई हे सुनावणी घेत आहेत. सोमवारी कळझोंडीतील ग्रामस्थांनी त्यांचे आक्षेप सविस्तरपणे नोंदविले. तर मंगळवारी वाटदच्या ग्रामस्थांनी त्यांचे आक्षेप नोंदविले.
अंबानी डिफेन्सला विरोध – वाटद एमआयडीसी क्षेत्रात होऊ घातलेल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यालाही परिसरातील गावांमधील अनेक ग्रामस्थांनी आक्षेप घेत विरोध दर्शविला आहे. विशेषतः जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून ज्या लोकांनी आक्षेप घेतला आहे, त्यांनी हा प्रकल्प नको, अशी भूमिका मांडली आहे. पर्यटन आणि फलोद्यान या माध्यमातून या निसर्गरम्य परिसराचा विकास होऊ शकतो. अशा ठिकाणी प्रदूषणकारी प्रकल्प आणू नयेत, अशी भूमिका अनेक ग्रामस्थांनी मांडली आहे.
जमिनीचा दर किती? – काही ग्रामस्थांनी प्रकल्पासाठी जी जमीन संपादित करण्यात येणार आहे, तिचा दर किती? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आमच्याकडून कवडीमोल भावाने जमिन खरेदी करून एमआयडीसी नंतर कोट्यावधी रूपयांना ती उद्योगपतींना विकण्याचा डाव असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
९०४ हेक्टर जमिन आवश्यक – अंबानी डिफेंन्स या प्रकल्पासाठी ९०४ हेक्टर जमिन आवश्यक आहे. वाटद परिसरातील ५ गावांमधील ही जमिन आहे. त्याचा दर अजूनही जाहीर झालेला नाही. दर जाहीर झाल्यावर काहींचा विरोध मावळू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कवडीमोल भावाने जमिन विकणार नाही, असेदेखील अनेकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अनेक प्रश्न – आक्षेप घेणाऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकल्पक्षेत्रात सध्या ज्या मालमत्ता आहेत, घरे आहेत, त्यांचे काय? पुनर्वसनाचे काय? दर किती? काही ग्रामस्थांनी जमिनी विकल्या आहेत, त्यांची स्थिती काय? असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. घरे वगळून जमिन संपादित करावी, अशी भूमिका काहींनी घेतली आहे. त्यासाठी जमिनीची मोजणी केली गेली. काही ग्रामस्थ सहकार्याची भूमिका घेत आहेत. घरे वगळूनच उर्वरित जमिनीची मोजणी करण्यात आली आहे, असे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले. ५ गावांतील जमिन अंबानी डिफेन्स प्रकल्पासाठी लागणार आहे. या ५ गावांमधील अनेकांनी आपले आक्षेप नोंदविले आहेत. त्यावर सुनावणी सुरू आहे. चर्चेअंती तोडगा निघेल, असा विश्वास उद्योगमंत्री ना. उदय सामंत. व्यक्त करत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असे सांगितले जात आहे.