शहरातील नदीपात्रालगत उभारण्यात आलेले मटण-मासळी मार्केट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. माजी नगरसेवक इनायत इब्राहिम मुकादम यांनी पालिकेच्या गाळ्यांचा लिलाव करण्याच्या हालचालींना आक्षेप घेत मुख्याधिकारी विशाल श्रीरंग भोसले यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. मटण व मच्छीमार्केटची इमारत २००९ मध्ये उभारण्यात आली. बांधकाम झाल्यापासून अनेक गाळे वापरात नाहीत. परिणामी, आज ही इमारत जीर्णावस्थेत उभी आहे. लोखंडी शटर पूर्णपणे गंजलेले आहे. भिंतीवरील प्लास्टर सुटले आहे. इमारतीत शेवाळ व झाडेझुडपे वाढली आहेत, तर पाण्याच्या टाक्या चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. २०२० मध्ये इमारतीचे मूल्यांकन करून आवश्यक नूतनीकरण व सुविधा उपलब्ध करण्यासाठी तब्बल ६२ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. २०२३ ला या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली; मात्र निधीअभावी आजतागायत ही कामे पूर्ण झाली नाहीत. परिणामी, लिलाव प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर, पालिकेने सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाडून मटण-मासळी व भाजी मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. या अहवालात इमारतीतील तांत्रिक त्रुटी व दुरुस्तीच्या बाबी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत. विशेषतः शटर बदलणे, प्लास्टर नव्याने करणे, हवामानरोधक रंगसंगती, स्वच्छता अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे; मात्र या सूचनांची अंमलबजावणी पालिकेने केलेली नाही. थातुरमातूर दुरुस्त्या करून गाळे वापरण्यायोग्य असल्याचा दिखावा सुरू आहे. या कामांवर लक्ष ठेवल्यानंतर व प्रत्यक्ष स्थळावरील छायाचित्रांवरून ही बाब स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या दुरुस्त्या व प्रमाणपत्रांशिवाय लिलाव प्रक्रिया राबविल्यानंतर होणाऱ्या नुकसान वा आर्थिक हानीस मुख्याधिकारीच वैयक्तिक जबाबदार धरले जातील, असा इशारा मुकादम यांनी दिला आहे.
इमारतीमध्ये प्रचंड त्रुटी – या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही, मंजूर आराखडा उपलब्ध नाही, शौचालयाची सुविधा नाही, सांडपाणी प्रक्रिया केंद्रही नाही. ही इमारत पूररेषेत असून, तेथे मार्केट कार्यान्वित करणे धोकादायक आहे.