अतिशय वेगळी कल्पकता, विशेष डिझाईन, देखणे काम आणि उत्तम दर्जा अतिशय कमी कालावधीत जिल्हा परिषद चिपळूण बांधकाम विभागाने सव्वाकोटींची संरक्षक भिंत उभारली आहे. जिल्हा बांधकाम उपविभाग चिपळूणचे शाखा अभियंता आशुतोष सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिलेली ही भिंत सरकारी यंत्रणेसमोर आदर्शवत आहे. याच पद्धतीने दर्जेदार विकासकामे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी केली पाहिजे, असे सांगत आमदार शेखर निकम यांनी या कामाचे कौतुक केले. शहरातील बायपास मार्गावर लाईफकेअर रुणालयाच्या बाजूच्या डोंगरावर मुस्लिम समाजाचे अतिशय भव्य सभागृह उभारले जात आहे. बहुतांश काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सभागृहाच्या सुरक्षतेसाठी आमदार निकम यांनी मूलभूत सोयी-सुविधा योजनेतून सव्वाकोटी रुपयांचा निधी संरक्षक भिंतीसाठी दिला आहे.
राज्यात प्रथमच या योजनेतून निधी मिळाला तो फक्त चिपळूणला वर्दळीच्या ठिकाणी असलेली ही भिंत बारा मीटर उंच आणि ३२ मीटर लांबीची आहे. शाखा अभियंता आशुतोष सरदेसाई यांनी उपअभियंता मेश्राम यांच्या मार्गदर्शनानुसार अतिशय उत्तम दर्जाचे काम करून घेतले आहे. एवढे मोठे काम प्रथमच जिल्हा परिषदेला मिळाले होते. शाखा अभियंता सरदेसाई यांनी आरसीसीचे खास वेगळे डिझाईन तयार केले. भिंत दिसताना सुरेख दिसली पाहिजे आणि तिचा दर्जाही उत्तम असला पाहिजे, याची काळजी घेत उत्तम काम उभे केले असून, या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले.