आंबा खाल्ल्यानंतर फेकून दिल्या जाणाऱ्या कोयींपासून तेलनिर्मिती आणि मँगो बटर तयार करण्याचे यशस्वी संशोधन राजापूर तालुक्यातील खडकवलीचे डॉ. ऋषिकेश गुर्जर यांनी केले. आंब्याच्या कोयींपासून तयार केलेले तेल आणि मँगो बटर अन्नउद्योगासाठी पौष्टिक व स्थिर चरबी स्रोत; तर कॉस्मेटिक उद्योगासाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक घटक म्हणून उपयुक्त ठरणार आहे. या संशोधनामुळे फेकून देण्यात येणाऱ्या कोर्यांच्या पुनर्वापरातून शाश्वत उत्पादन, स्थानिक उद्योगांची वाढ आणि पोषकमूल्य वाढवण्याची नवी द्वारे खुली होणार आहेत. हापूस आंब्याच्या कोयींचा नवीन झाडे निर्मितीशिवाय अन्य पुनर्वापर केला जात नाही, हे लक्षात घेऊन ऋषिकेश यांनी बाटांवर संशोधन केले आहे. त्यात कोयींच्या तेलाचे निष्कर्षण करून गुणधर्म तपासले. त्यानंतर नानकटाई कुकीजमध्ये त्यांनी वनस्पती तुपाऐवजी या तेलाचा वापर केला. आंबा कोयींपासून मिळणारे तेल शुद्धीकरण केल्यानंतर ते मँगो बटर या स्वरूपात रूपांतरित केले जाते.
हे बटर कॉस्मेटिक उद्योगात विशेषतः त्वचा मृदुकारक, लिप बाम, लोशन, हेअर क्रीम आणि सोप उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. मँगो बटरमध्ये ओलेइक अॅसिड आणि स्टिअरिक अॅसिड मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते त्वचेसाठी अत्यंत सुरक्षित, पोषणदायी आणि हायपोअॅलर्जेनिक मानले जाते. बटर खाद्य स्वरूपातही ते पूर्णतः सुरक्षित असून, वनस्पती तुपाचा उत्कृष्ट पर्याय म्हणून कुकीज, बेकरी पदार्थ, चॉकलेट, मिठाई आणि स्नॅक्स उत्पादनात वापरण्यास उपयुक्त आहे. कोयींचे तेल आणि त्यापासून तयार होणारे मँगो बटर हे दोन्ही अन्नउद्योगासाठी पौष्टिक व स्थिर चरबीस्स्रोत आणि कॉस्मेटिक उद्योगासाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक घटक म्हणून उपयुक्त ठरत असल्याचे गुजर यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
नानकटाई कुकीजमध्ये अभिनव वापर – कोयींचे तेल तेलवनस्पती तुपाचा पर्याय म्हणून नानकटाई कुकीज तयार करण्यासाठी वापरले गेले. या प्रक्रियेत तेलाचे प्रमाण २५, ५० आणि ७५ टक्के असे ठेवले. तयार कुकीजचे भौतिक रासायनिक विश्लेषण, तसेच तीन महिन्यांचे संवेदनात्मक मूल्यांकन करण्यात आले. त्यात टी १ कुकीज (२५ टक्के आंबा तेल वापरलेल्या) सर्वाधिक स्वीकारार्ह ठरल्या. त्यांची चव, पोत आणि टिकाऊपणा उत्तम होता, तर टी २ (५० टक्के) आणि टी ३ (७५ टक्के) नमुन्यांचा दर्जा तुलनेने थोडा कमी होता.
अशी केली तेलनिर्मिती – आंबा कोयींपासून तेलनिर्मितीसाठी विभक्त प्रक्रिया (सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन) आणि प्रचंड दाबाचा (कोल्ड प्रेस) वापर करण्यात आला आहे. या प्रक्रियेत कण आकार (१-५ मिमी), द्रावक प्रकार (एन-हेक्साने आणि पेट्रोलियम इथर) आणि निष्कर्षण वेळ (९० मिनिटे) हे घटक विचारात घेण्यात आले. प्रक्रियेअंती विभक्त प्रक्रिया पद्धतीमध्ये सर्वाधिक तेल उत्पन्न १०.९० टक्के मिळाले, तेही ५० अंश तापमानावर, एन-हेक्साने द्रावक वापरून आणि ९० मिनिटांच्या कालावधीत त्यानंतर ६० अंश आणि ७० अंश तापमानांवर अनुक्रमे १०.६० टक्के आणि १०.५५ टक्के तेल मिळाले, तर कोल्ड प्रेस पद्धतीने फक्त ५ टक्के तेल उत्पन्न आढळले. पेट्रोलियम इथर द्रावक वापरल्यास ५० अंशांवर ९.६० टक्के आणि ६०-७० अंशांवर सुमारे ९.४० टक्के तेल मिळाले.

