चिपळूण शहराच्या महापुराला कारणीभूत असलेला बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुना पूल पावसाळ्यानंतर तोडण्यात येणार आहे. याबाबत महसूल विभागाकडून सामाजिक कार्यकर्ते अरुण भोजने यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. बहादूरशेख नाका येथे वाशिष्ठी नदीवर जुना पूल उभा आहे. पुलाच्या पिलरखाली मातीचे ढिगारे तयार झाले आहेत. वाशिष्ठी नदीत पोफळीपासून येणारा गाळ बहादूरशेख नाका येथे पुलाच्या परिसरात साचत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीतील पाण्याच्या वहनक्षमतेवर परिणाम होत आहे. या ठिकाणी पाण्याचा फुगवटा मारत असल्यामुळे बहादूरशेख नाक्यासह खेर्डी परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात वाशिष्ठी नदीवर नवा पूल बांधण्यात आल्यानंतर जुना पूल तोडण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुरू झाली होती. माजी नगरसेवक अरुण भोजने यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता; मात्र काही राजकीय नेत्यांनी हा पूल पाडण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे वाशिष्ठी नदीवरील पूल पाडण्याबाबत अनिश्चितता होती. भोजने यांनी हा पूल पाडणे का गरजेचे आहे, पूल पाडल्यानंतर पूरपरिस्थितीवर कसा परिणाम होईल याची माहिती संबंधित विभागाला दिली होती. तसेच पूल न पडल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर महसूल आणि संबंधित विभागाकडून पूल पाडण्यासंदर्भात अभ्यास सुरू झाला.
नुकतेच एमआयटी मुंबईच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी या पुलाची पाहणी केली. त्यानंतर पूल पाडणे गरजेचे आहे, असा अहवाल समितीने संबंधित विभागाला आणि महसूल विभागाला दिला आहे. त्यामुळे वाशिष्ठी नदीवरील जुना पूल पाडण्यासंदर्भातील तांत्रिक अडचण दूर झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग, जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाकडून पूल पाडण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर रितसर पूल पाडण्यासाठीचे काम सुरू होईल. माजी नगरसेवक भोजने यांनी यासाठी उपोषण करू नये, असे पत्र महसूल विभागाने त्यांना दिले आहे.