25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आज रत्नागिरी दौऱ्यावर

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आज रत्नागिरी दौऱ्यावर

४५ हजार महिला लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या (ता. २१) ऑगस्टला रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. विमानतळ टर्मिनल भूमिपूजन, लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय नामकरण आणि इमारत लोकार्पण व महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत चंपक मैदानावर महिला सन्मान सोहळा होणार आहे. यासाठी सुमारे ४५ हजार लोक बसतील एवढा भव्य पेंडॉल घातला आहे. १५० पोलिस अधिकारी आणि ६०० कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी दक्ष राहावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. पालकमंत्री सामंत म्हणाले, आरोग्य विभागाने कार्यक्रमाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची सोय करण्यात आली आहे. तसचे चंपक मैदान येथे १५ बेडचे हॉस्पिटल तयार केले आहे.

पोलिस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी पार्किंगची व्यवस्था, गर्दीचे नियंत्रण आणि वाहतूक नियमन करावे. वाहतूक कोंडी होणार याची दक्षता घ्यावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फूड पॅकेटची व्यवस्था, नाश्ता याबाबतही नियोजन केले आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृहांची सोय केली आहे. मुख्यमंत्री महोदयांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. पालकमंत्री सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, आदींनी पेन्डॉलच्या कामाची पाहणी केली. सुरक्षेच्यादृष्टीने अनेक सूचना केल्या.

महिलांची गर्दी अपेक्षित – जिल्ह्यातील सुमारे ४५ हजार महिला लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक तालुक्यातून महिलांना येण्यासाठी सुमारे ११०० एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. हा शासकीय कार्यक्रम असल्याने त्याच्या खर्च देखील जिल्हा नियोजनमधून करण्यात येणार आहे. कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये, याची पूर्ण काळजी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने घेतली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular