ऑनलाईन खरेदी करणे हे एक प्रकारे सोयीस्कर पडत असल्याने अनेक जण लहानात लहान वस्तू देखील ऑनलाईनच खरेदी करताना दिसून येतात. इलेक्ट्रोनिक वस्तूसाठी माहिती काढण्यापासून ते खरेदीपर्यंत अनेक जण ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत. विविध कंपन्या देणारी आमिषे, त्यांच्या विविध स्कीम्सकडे आकर्षित होऊन ग्राहक आपसूकच ऑनलाईन खरेदीकडे वळतो. परंतु, ऑनलाईन खरेदी करताना देखील तेवढीच सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
रत्नागिरी येथील एका तरुणीची ओएलएक्स वर खरेदी करताना हजारो रुपयांची फसवणूक झाली. ओएलएक्स वर विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आयपॅड खरेदी करण्याच्या नादामध्ये ७१ हजार ८०० रुपयांची फसवणूक करून अज्ञाताने चांगलाच चुना लावला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार दि. १२ जुलै रोजी दुपारी १.३४ वा. साळवी स्टॉप परिसरामध्ये घडली.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव शिवम पांडये असे आहे. या प्रकरणात संबंधित तरुणीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्यांच्या लहान भावाला आयपॅड खरेदी करायचा होता. त्याने ओएलएक्सवर आयपॅड विक्रीची जाहिरात पाहून खरेदी करण्याची तयारी दर्शवली. आयपॅड सेकंड हॅन्ड असल्याने २४ हजार रुपयांना खरेदी करण्याचे ठरले. ठरलेली किमत देऊन सुद्धा शिवम पांडयेने गुगल पे वर वेळोवेळी पैसे भरण्यास सांगून तब्बल ७१ हजार ८०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.