अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाबाबत अजूनही अनेक बातम्या समोर येत आहेत. रोज नवीननवीन अपडेट येतच आहेत. कधी त्यांचे लग्न ठरल्याचे सांगितले जाते तर कधी लग्नाच्या बातम्यांचे खंडन केले जाते आहे. त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत मोठा खुलासा झाला आहे. जवळच्या मित्रमंडळींच्या माध्यमातून त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. ९ डिसेंबरला हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांचे लग्न राजस्थानमधील सवाई माधवपूर येथील फोर्ट बरवारा या रिसॉर्टमध्ये होणार आहे.
दोघेही ९ डिसेंबरला हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. या लग्नसोहळ्याला या दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि काही जवळचे मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत. राजस्थानमध्ये ७ आणि ८ डिसेंबर रोजी संगीत आणि मेहंदी सोहळा रंगणार आहे. परंतु, विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नाशी संबंधित कोणतीही बातमी सार्वजनिक होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लग्नाबद्दलची सर्व माहिती गोपनीय राहावी याची काळजी घेतली जात आहे. या दोघांचे अनेक नातेवाईकही माध्यमांशी बोलणे टाळत आहेत.
सध्या अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण सूत्रांकडून या लग्नाला दुजोरा मिळत आहे. या लग्नाला येणार्या पाहुण्यांच्या नावाची चर्चाही रंगली आहे. या लग्नात जवळपास २०० च्या आसपास पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा विवाह मोठ्या शाही स्वरुपात थाटामाटात संपन्न होणार आहे. या लग्नाच्या संगीत सेरेमनी आणि मेहंदी सोहळ्याशी संबंधित अनेक बातम्या चर्चेत येत आहेत. या उत्सवांचे विशेष नियोजन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एक यादी समोर आली होती, ज्यामध्ये या लग्नात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची नावे लिहिली होती.