गणेशोत्सवामध्ये एसटी महामंडळाने चाकरमानी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी जादाच्या बसेसची व्यवस्था केली होती. सध्या दिवाळीचा सण काही दिवसावरच येऊन ठेपल्याने आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने यंदा राज्यभरात १४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यासोबतच भाडेवाढीचा देखील निर्णय घेतला आहे. सणासुदीसारख्या या महागाईच्या दिवसात मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून मिळत आहेत.
दिवाळीनिमित्त सुट्ट्यांचा हंगाम पाहता एसटी महामंडळाने राज्यभरात जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी महामंडळाने ५ ते ७५ रुपयांपर्यंतची भाडेवाढ जाहीर केली आहे. महामंडळाची ही भाडेवाढ हंगामी स्वरुपाची असून दिवाळीच्या दरम्यान म्हणजे २० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ही केवळ हंगामी भाडेवाढ असणार आहे. मात्र शिवनेरी आणि अश्वमेध या प्रकारच्या बसेसला ही हंगामी भाडेवाड लागू असणार नाही.
दिवाळीनिमित्त महसूल वाढवण्यासाठी एसटी महामंडळाकडून केवळ १० दिवसांसाठी ही भाडेवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ साधी परिवर्तन, निमआराम हिरकणी, शिवशाही आसन आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक प्रवास करताना घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेबरपासून हंगामी भाडेवाढ संपुष्टात येऊन तिकीट दर पूर्ववत होतील. हंगामी भाडेवाढमध्ये तिकीट दरात ५ रुपयांपासून ७५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.