तालुक्यातील गुढे येथे एकाचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २६) दुपारी साडेअकराच्या सुमारास गुढे मोरेवाडी येथे घडली. हा हल्ला गव्याने केला असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मात्र वन विभागाने शवविचेछदन अहवालानंतर हल्ला कोणी केला हे समजू शकेल असे स्पष्ट केले. रवींद्र पाडुरंग आग्रे (वय ५५, गुढे जोगळेवाडी) असे मृताचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आग्रे दुचाकीवरून गुढे मोरेवाडी येथून मार्गताम्हाणे येथे निघाले होते. त्याच वेळी त्यांच्यावर जंगली प्राण्याने हल्ल केला असावा, असा अंदाज आहे. आग्रे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते रक्तस्त्राव झाल्याने त्यांना हालचाल करता येत नव्हती. या मार्गावरून निघालेल्या काही लोकांनी आग्रे यांना रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रान हलविले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळता गुढेतील ग्रामस्थ रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले.
वन विभागालाही याची माहिती देण्यात आली. सावर्डे व चिपळूण वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. गुढे येथे दुपारी भरपूर पाऊस असल्याने वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा शोधताना अडचणी येत होत्या. काही लोकांनी बिबट्याने केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली. काहींनी गव्याने हल्ला केल्याचे सांगितले. त्यामुळे नेमका हल्ला कोणी केला, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र त्यांच्या शरीरावरील जखमांवरून हा हल्ला जंगली वन्य प्राण्यांनी केला असावा असे वन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, रात्री कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू होते. शवविचेछदन अहवालानंतर हल्ला कोणी केला त्याचा उलघडा होईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रवींद्र आग्रे यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.