सागरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विरोध झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी काळबादेवी ग्रामपंचायत येथे बोलावलेल्या सभेत सदर सागरी महामार्ग हा काळबादेवी गावातूनच व्हायला हवा. या प्रकल्पाला आमचा विरोध नाही, परंतु स्थानिकांची पारंपारिक घरे बाधीत होणार नाहीत याची सरकारने दखल घेणे गरजेचे आहे असा एकमुखी सूर काढण्यात आला. दरम्यान पालकमंत्र्यांनी यासंदर्भात ग्रामपंचायतीने एक विशेष सभा बोलावून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यावे याबाबतचा अहवाल आपल्याकडे सादर करावा. ग्रामस्थांच्या शंकांचे आणि तक्रारींचे पूर्णपणे निरसन करण्यात येऊन हा प्रकल्प पुढे नेण्यात येईल असे निःसंदीग्ध ग्वाही दिली.
काही दिवसांपूर्वी मिऱ्या काळबादेवी पूलाचा पोहोचमार्ग आणि त्यापुढील मार्ग याची मोजणी करण्यासाठी काळबादेवीत दाखल झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रथकाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला होता. यावेळी ग्रामस्थांची घरे बाधित होणार नाहीत अशा पध्दतीने भूसंपादन व्हावे अशी मागणी रेटून धरण्यात आली होती. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप करुन या मोजणीला स्थगिती दिली होती. तसेच लवकरच याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
त्याप्रमाणे शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी पालकमंत्री उदय सामंत यांनी काळबादेवी ग्रामपंचायत येथे एक सभा घेतली आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. या महामार्गाबाबत त्यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आणि नजिकच्या भविष्यात सर्व तक्रारींचे निरसन करुन हा महामार्ग पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.