परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वाढले आहेत. त्यासोबत कांदा-बटाटाही महाग झाल्याने गृहिणींचे आर्थिक गणित विस्कटले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत लाडक्या बहिणींसारखी योजना राबवणाऱ्या शासनाने भाजीपाल्याचे दर आवाक्यात आणावेत, अशी मागणी गृहिणी करत आहेत. सध्या बहुतांश भाज्या ८० ते १०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. यावर्षी पाऊस लांबल्याने तसेच काही भागात अवकाळी झाल्याने भाजीपाला उत्पन्नावर परिणाम झाला असून, त्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेले काही दिवस कोथिंबीरीच्या दरात वाढ झाली असून, ३० रुपये दराने कोथिंबीर जुडीची विक्री सुरू आहे. कोथिंबीरसह पालेभाज्यांच्याही दरात वाढ झाली असून, कोथिंबीर जुडी ३० ते ४० रुपये दराने विकली जात आहे. दरवाढीमुळे ग्राहक खरेदी करण्यापूर्वी विचार करत आहेत. स्थानिक पावटा विक्रीला येण्यासाठी अद्याप दीड-दोन महिन्याचा अवधी आहे; मात्र बाजारी पावटा विक्रीसाठी उपलब्ध असून, ९० ते १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. कांदा सत्तरीत तर बटाटे साठीत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ८० ते ९० रुपये किलो दराने कांदा विक्री सुरू होती; मात्र आता ७० रुपये किलोवर दर आला आहे. पावसाअभावी शेंगाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे स्थानिक भाजीपाला बाजारात जिल्ह्यात रब्बी हंगामात येण्यासाठी अद्याप एक ते दीड महिन्याचा अवधी आहे. तोपर्यंत परजिल्ह्यातील भाजीपाल्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. पालेभाज्या जुडी सध्या २५ ते ३० रुपये दराने विकण्यात येत आहे. हिवाळा असला तरी तापमान वाढल्याने काकडीला विशेष मागणी आहे. ५० ते ६० रुपये किलो दराने काकडी विक्री होत आहे. गेल्या महिन्यात सत्तरीत असलेला लाल टोमॅटो आता चाळीशीला आला आहे.