दहावी परीक्षेचा निकाल लागून अडीच महिने झाले तरी अद्याप अकरावी प्रवेश प्रकिया पूर्ण झालेली नाही. ऑनलाइन सुविधा अपुरी आणि सक्षम नसल्याने ही प्रवेश प्रकिया विद्यार्थ्यांसह पालकांना त्रासदायक ठरू लागली आहे. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याची सायऱ्यांना चिंता लागली आहे. येत्या आठ दिवसांमध्ये याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बजरंग दलाने दिला आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी राजापूर तहसील कार्यालयामध्ये बजरंग दलातर्फे देण्यात आले. निवेदन देताना बजरंग दल संयोजक निकेश पांचाळ, सहसंयोजक संदीप मसुरकर, अभिषेक पवार, नीतेश मसुरकर, सिद्धेश शिंदे, आदित्य शिवलकर, ऋषी म्हादये, तेजस मांजरेकर, मंदार नाचणेकर आदी उपस्थित होते.
यावर्षीपासून शासनाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश मिळत असल्याने प्रवेशासाठी रांगा लावाव्या लागल्या नाहीत. मात्र, प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या लक्षात घेता ऑनलाइन सुविधा अपुरी आणि सक्षम नसल्याने ही संकल्पना आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्रासदायक ठरली आहे. दहावीचा निकाल लागून सुमारे अडीच मंहिन्याचा कालावधी लोटला तरी, आतापर्यंत अकरावी प्रवेशाच्या केवळ दोनवेळा यादी प्रसिद्ध झाल्या असून त्यामध्ये ४० टक्केपेक्षा कमी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला आहे. बजरंग दल या सर्व विषयांचे गांभीयनि चिंतन करत असून, तरुण विद्यार्थ्यांचा वेळ सरकारी धोरणाचे पालन करण्यात फुकट जाणे हे आम्हाला मान्य नाही. ही शिक्षणाच्या मूलभूत हक्काची सरकारकडून होणारी पायमल्ली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.