ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या लांजा शहरासह तालुक्यातील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आपल्याला अकरावी प्रवेश मिळणार की नाही अशी संभ्रमावस्था आणि भीती पालक व विद्यार्थी वर्गात असून यामुळे पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकवर्गासह लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालकांनी तहसीलदार तसेच गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आणि आपल्या संतप्त भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या. शासनामार्फत यावर्षीपासून अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे लांजा शहरासह तालुक्यातील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ झाला आहे.
शाळा, महाविद्यालये सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी देखील अकरावी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया व शिक्षणाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आपल्या पाल्याला अकरावी प्रवेश मिळणार की नाही? की त्याचे यावर्षीचे शैक्षणिक वर्ष फुकट जाणार अशी भीती देखील विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेले नैराश्य दूर करण्यासाठी आणि पालकांच्या मनातील संभ्रमावस्था थांबवण्यासाठी प्रचलित ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, ज्येष्ठ संचालक महंमद रखांगी, सचिव महेश सप्रे, संचालक अॅड अभिजीत जेधे आदींसह पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.