वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली चार जणांनी मिळून रत्नागिरी तालुक्यातील महिलेची तब्बल ७ लाख ८१ हजार १०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ५ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन, जीन्सन जॉर्ज, अभिषेक शेट्टी आणि डेल्वीन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या टेलिग्राम अॅपवर अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजद्वारे त्यांना वर्क फ्रॉम होमची विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी होकार दिला. त्यानंतर मोहनने त्यांना हॉप्पर या हॉटेल बुकिंगच्या साईटचे प्रतिनिधी असल्याचे भासवून एका साईटवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या लकी टीम या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाल्या. या ग्रुपमध्ये ग्रुपचे ओनर जीन्सन जॉर्ज, ग्रुप अॅडमिन अभिषेक शेट्टी आणि दुसरे ग्रुप अॅडमिन | डेल्वीन व इतर व्यक्ती होते. मोहन यांनी फिर्यादी यांच्या मोबाईलवर वेळोवेळी हॉटेल बुकिंग रिव्ह्य देण्याकरता टास्क पूर्ण करण्यास व पुढील टास्कसाठी आगाऊ रक्कम भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांच्या कस्टमर सर्व्हिसने फिर्यादीशी संपर्क साधून वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती देऊन त्यात पैसे भरण्यास सांगितले.
त्यानुसार फिर्यादिंनी स्वतःच्या, साक्षीदार मोरे आणि आपल्या वडिलांच्या बँक खात्यातून वेळोवेळी असे एकूण ७ लाख ८१ हजार १०० रुपये भरले. परंतु त्यांनी डिपॉजिट केलेले पैसे हॉप्पर साईटकडून परत मिळाले नाहीत. तसेच फिर्यादिंनी संशयितांशी वारंवार संपर्क साधून पैसे परत करण्याची विनंती करूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी चार जणांविरोधात भा. दं. वि. कायदा कलम ४१९, ४२०, ३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल ‘करण्यात आला आहे.