कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या रत्नागिरी रेल्वेस्थानकावर केवळ इंग्रजी भाषेतील फलक लावण्यात आले आहेत. तिथे मराठी भाषेचे फलक लावले जावेत, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे. प्रवाशांची गैरसोय त्वरित दूर न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. रत्नागिरीत आले असता रेल्वेस्थानकावरील इंग्रजी भाषेतील फलक पाहिल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात आलेला असतानाच अशा पद्धतीने मराठीचे फलक रत्नागिरीतील रेल्वेस्थानकावर नसतील तर तो एकप्रकारे अपमानच आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. याबाबत रेल्वे प्रशासनाने आठ दिवसांत योग्य ती कार्यवाही करावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे. केवळ नामफलकांचाच मुद्दा नाही, तर कोकण रेल्वेच्या कारभारावरही सावंत यांनी टीका केली आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करा किंवा गाड्या वाढवा यासारख्या मागण्यांवर रेल्वेमंत्री नेहमी दुर्गम भाग आहे, खर्चिक बाब आहे, अशी पळवाट काढतात. विशेष म्हणजे, राज्यातील एक मंत्री याच रत्नागिरीतून निवडून आले असूनही त्यांना या परिस्थितीची चिंता नाही.
आजही कोकण रेल्वेच्या प्रवाशांवर अवाजवी अधिक भाड्याचा भार लादला जात असल्याची तक्रार त्यांनी केली. रेल्वेस्थानकांच्या सुशोभीकरणासाठी निधी खर्च केले जात आहेत; पण या दिखाऊ सुशोभीकरणाचा प्रवाशांना काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कणकवली स्थानकाचा परिसर असाच कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीत केला गेला; पण स्थानकावर प्रवाशांसाठी छप्पर (शेड) नाही. त्यामुळे प्रवाशांना स्वतःच्या सामानासोबत छत्री घेऊन उभे राहावे लागते किंवा तळपत्या उन्हात अपसरावे लागते. हीच विदारक परिक्षिवती रत्नागिरीसह कोकणातील सर्व रेल्वेस्थानकांवर असल्याचे खासदार सावंत यांनी स्पष्ट केले.
दिखाऊ सुशोभीकरण – कोकण रेल्वेच्या प्रवाशांवर अवाजवी अधिक भाड्याचा भार आजही लादला जात असल्याची तक्रार खासदार सावंत यांनी केली. रेल्वेस्थानकांच्या सुशोभीकरणासाठी निधी खर्च केले जात आहेत; पण या दिखाऊ सुशोभीकरणाचा प्रवाशांना काय उपयोग, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.