तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसह पालेभाज्या व फळ लागवडीसाठी शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मागेल त्याला शेततळे योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी तालुक्यातून यंदा ३० शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली होती, मात्र त्यातील २० शेतकरी स्वतःहून योजनेतून बाहेर पडल्याने केवळ २ शेतकरीच लाभार्थी ठरले आहेत. उर्वरित ८ प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या सरासरीत घट झाली आहे.
पावसाचे कमी प्रमाण व अनिश्चिततेमुळे ग्रामीण भागातील कोरडवाहू क्षेत्रातील भातशेती, भाजीपाला पिकांवर व फळपीक लागवडीवर तसेच उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होताना दिसून येतो. पावसात पडलेला खंड, पाण्याची टंचाई यामुळे पिकांचे नुकसान होऊ नये व उत्पन्नात व्हावी, यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेततळे उपलब्ध करून दिले जात आहेत. १५ x १५ मीटर लांबी-रुंदी व ३ मीटर खोलीसाठी २६ हजार रुपये, तर ३४ मीटर लांबी-रुंदी व ३ मीटर खोलीसाठी ७५ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जात आहे.
शेततळ्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०२३ – २४ या वर्षात ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र त्यातील २० शेतकऱ्यांनी या योजनेतून बाहेर पडत आपले अर्ज रद्द केले आहेत. त्यामुळे उर्वरित १० पैकी २ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर झाले असून यामध्ये तालुक्यातील तिसंगी येथील प्रल्हाद बाबुराव शिंदे व आंबयेतील दिगंबर धोंडू सकपाळ यांचा समावेश आहे. उर्वरित ८ शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.