वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यातील इतर गावांमधून रत्नागिरी शहरामध्ये उपचारासाठी येणे, तो लांबचा प्रवास, रस्त्यांची दुर्दशा, रुग्णांसोबत नातेवाईकांचे होणारे हाल लक्षात घेऊन, आमदार राजन साळवी यांनी लांजा येथील सांस्कृतिक भवन येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे सुचविले होते. त्याचप्रमाणे कोविड सेंटर साठी आवश्यक असलेल्या सोई सुविधांची आणि दुरुस्ती घडवून आणण्याची मागणी केली होती, त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना कोविड निधीचा वापर करण्याचेही सुचविले होते.
आज दि. ५ जून २०२१ रोजी लांजा येथील सांस्कृतिक भवन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा दुपारी राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार राजन साळवी, सिंधुदुर्ग संघाचे खासदार विनायक राउत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्र फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापुरकर, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत इत्यादी संबंधित अधिकारी यांची मान्यवर म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
आमदार राजन साळवी जनतेच्या सेवेसाठी काळ वेळ न बघता कायमच कार्यतत्पर असतात. आधीच कोरोनामुळे जनतेचे झालेले हाल बघवत नसल्याने कोविड सेंटर कुठेतरी जवळ आणि सोयीचे पडावे यासाठी राजन साळवी यांनी कठोर मेहनत घेऊन सेंटर उभे करण्यासाठी लागणारा लाखोच्या निधीची देखील मंजूरी मिळवली. लांजावासीय जवळ तयार झालेल्या कोविड सेंटर मुळे समाधान पावले आहेत. आणि आमदार साळवीचे विशेष आभार मानले आहेत.