कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी केलेले उपोषण गणेशोत्सवातही सुरू आहे. प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे डंपिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत शासकीय रस्ता नाही. जवळ जलस्रोत आहेत. वाडीवस्ती अवघ्या १८० मीटरवर आहे. इतक्या साऱ्या डंपिंग विरोधातील गोष्टी असूनही नगरपंचायतीने जागेचे खरेदीखत केले. या विरोधात आणि डंपिंग ग्राउंड हटावसाठी कोत्रेवाडी ग्रामस्थ १४ ऑगस्टपासून उपोषणाला बसले आहेत. शनिवार (ता. ३) उपोषणाचा १७ वा दिवस आहे.
गणेशोत्सवाला सुरुवात होऊन तिसरा दिवस उजाडला तरी प्रशासनाकडून ग्रामस्थांना ठोस उत्तर दिले जात नसल्याने ग्रामस्थ उपोषणावर ठाम आहेत. नगरपंचायतीने चुका करायच्या आणि आम्ही ग्रामस्थांनी त्या भोगायच्या का? असा संतप्त सवाल उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. गणेशोत्सवात गणपती घरी विराजमान झाले असताना कोत्रेवाडी ग्रामस्थ डंपिंग ग्राउंड हटावसाठी उपोषणाला बसले आहेत. उत्सवात ग्रामस्थांवर उपोषण करण्याची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.