राज्यात जुलै महिन्यात सरासरी १३८ टक्के सरासरी पाऊस पडला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पुढील तीन ते चार दिवस कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्याला गुरुवारपासून ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्याला शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील दोन ते तीन दिवस कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढलेला असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुण्यातील – ताम्हिणी घाटात सर्वाधिक पाच हजार मिलीमीटर पाऊस जुलै महिन्यात नोंदविण्यात आला आहे. जुलैमध्ये कोकण विभागात मुसळधार पावसाने उपस्थिती लावली. परिणामी मुंबईत महिनाअखेरपर्यंत कुलाबा येथे १,३८६ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे १,६९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रायगडमधील कर्जत, माणगाव, पोलादपूर, सुधागड, ताळे, रत्नागिरीतील दापोली, मंडणगड, राजापूर, संगमेश्वर येथे, सिंधुदुर्गात आवळेगाव, दोडामार्ग या केंद्रांवर जुलैमध्ये दोन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास १ लाख ३८ हजार २६२.५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने समोर आली आहे, यात एकूण १२७ तालुके बाधित झाले असून २५ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असल्याची माहिती पीक पाहणी अहवालाच्या माध्यमातून उजेडात आली आहे, काही भागांमध्ये शेतकऱ्यांना ओला दुष्काळाचा सामना करावा लागला आहे.