निकषाप्रमाणे कोत्रेवाडीतील जागा डंपिंग ग्राउंडसाठी योग्य नाही. त्यामुळे या जागेची फेरतपासणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा सहआयुक्त रत्नागिरी यांनी राजापूर तहसीलदार यांना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनानेच कोत्रेवाडी येथील जागेची फेरतपासणी करण्याचे आदेश दिल्याने येथील ग्रामस्थ यांनी गेल्या चार वर्षांपासून छेडलेल्या लढ्याचे हे यश आहे. सर्व बाबी पायदळी तुडवून प्रशासनाकडून हा प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप करत गेल्या चार वर्षांपासून कोत्रेवाडी ग्रामस्थांनी या विरोधात लढा पुकारला आहे. हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी अनेकदा आंदोलन, उपोषणाचे मार्गदेखील ग्रामस्थांनी पुकारले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांसह उल्का विश्वासराव, मंगेश आंबेकर यांनी सांगितले की, कोत्रेवाडी येथे राबवण्यात येणार प्रकल्प हा पूर्णपणे चुकीचा आहे.
शासनाच्या कोणत्याही निकषात तो बसत नाही. हा ग्राउंड प्रकल्प कोत्रेवाडी येथून हद्दपार व्हावा यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. आता जिल्हा सहआयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय तुषार बाबर यांनी कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंडची जागा ही शासनाच्या २०१६च्या निकषाप्रमाणे नाही. सदर जागा ही डम्पिंग ग्राउंडसाठी अयोग्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने सदर जागेची फेरतपासणी करण्यात येऊन त्याचा अहवाल लांजा नगरपंचायत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास एका महिन्याच्या आत सादर करावा, असे या पत्राद्वारे राजापूर तहसीलदार यांना सूचित करण्यात आले आहे.
ग्रामस्थांचे हे आहेत आक्षेप – वस्तीलगत डंपिंग ग्राउंड (घनकचरा) प्रकल्प, शासनाच्या सर्व अटीशर्तीची पायमल्ली, प्रकल्प लोकवस्तीलगत १०० मीटरवर, प्रकल्पासाठी रस्ता नाही, जवळच जलस्रोत.
उपोषण तूर्तास मागे – चुकीच्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या डंपिंग ग्राउंडविरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी २६ जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र जिल्हा प्रशासनाकडून कोत्रेवाडी येथील डंपिंग ग्राउंड प्रकल्पाच्या जागेची फेरतपासणी करण्याचे पत्र ग्रामस्थांना प्राप्त झाल्याने ग्रामस्थांनी उपोषण तूर्तास मागे घेतले आहे.