28.3 C
Ratnagiri
Saturday, August 9, 2025

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना सुविधा केंद्र – सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गणेशउत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात...

सिंधुदुर्गात पुन्हा ‘लम्पी’चा प्रकोप…

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पशुपालकांचे कंबरडे मोडलेल्या 'लम्पी...

समुद्र शांत झाल्याने मच्छीमार आनंदात…

वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही...
HomeRatnagiriगणपतीपुळेत यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश

गणपतीपुळेत यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश

पहाटे साडेतीन ते रात्री साडेदहा अशा कालावधीत भाविकांना दर्शन घेता येईल.

तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवारी (ता. १२) अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव आहे. पवित्र श्रावण महिना व त्यात अंगारकी अशा दुग्धशर्करा योगामुळे दर्शनासाठी ५० ते ६० हजार भाविक श्रींच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यात्रोत्सवाचे अतिशय चोख नियोजन करून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार व प्रांतधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अंगारकीच्या नियोजनासाठी विशेष बैठक गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात तहसीलदार राजाराम म्हात्रे व प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या उपस्थितीत झाली. यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाची व अन्य व्यवस्था अतिशय सुरळीतरीत्या उपलब्ध होण्याच्यादृष्टीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायत, देवस्थान समिती, पोलिस, महावितरण, आरोग्य विभाग, आरटीओ, एसटी महामंडळ, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, महसूल विभाग व अन्य सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

घाटमाथ्यासह महाराष्ट्रातील अन्य ठिकाणाहून मोठी गर्दी होईल, असा अंदाज आहे. गतवर्षीच्या अंगारकीला २५ हजारांचा अंदाज होता; परंतु जवळपास ५० हजारांहून अधिक भाविक आले. त्यामुळे या वेळी गर्दीत मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिर आणि गणपतीपुळे परिसरात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत नेटके नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा, पाणीव्यवस्था, पार्किंग व्यवस्था व अन्य सर्व प्रकारच्या सोयीसुविधा भाविकांना तत्पर मिळण्याच्यादृष्टीने ग्रामपंचायतीने कटाक्षाने लक्ष घालावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या.

या वेळी संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर, पंच अमित मेहेंदळे, विद्याधर शेंडे, गणपतीपुळे गावच्या सरपंच कल्पना पकये, जयगड पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील, मुख्य पुजारी अभिजित घनवटकर, ग्रामपंचायत सदस्य राज देवरूखकर, ग्रामसेवक प्रवीण चौधरी, गणपतीपुळे पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी, राहुल घोरपडे, भागवत, मालगुंड तलाठी कार्यालयाचे मंडल अधिकारी अरुण जाधव, तलाठी वीर, कोतवाल सुशील दुर्गवळी, मालगुंड आरोग्य विभागाचे नागवेकर व विविध खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणपतीपुळे देवस्थानचे मुख्य लिपिक महेश भिडे यांनी स्वागत केले.

१८ तास मिळणार दर्शन – अंगारकी उत्सवाच्या निमित्ताने स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता दर्शनासाठी खुले होईल. गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांच्या हस्ते श्रींची पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले राहील. पहाटे साडेतीन ते रात्री साडेदहा अशा एकूण १८ तासांच्या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येईल.

समुद्र धोकादायकचा सूचनाफलक – गणपतीपुळे परिसरातील सर्व खड्डे बुजवण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत. खवळलेल्या समुद्राची सध्याची धोक्याची स्थिती लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांना सूचना मिळाव्यात यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि सर्व यंत्रणांच्या वतीने परिसरात माहितीफलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच किनारी विशेष गस्त घालण्यासाठी ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानच्या सुरक्षारक्षकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

येथे करा पार्किंग – भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यासाठी गणपतीपुळे येथील सागरदर्शन पार्किंग, महालक्ष्मी हॉल आणि गणपतीपुळे खारभूमी मैदान या भागात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular