ओव्हरलोड खनिज वाहतुकीविरोधात निगुडे सरपंच समीर गावडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज आंदोलन छेडले. आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी फोनद्वारे पाठिंबा दर्शवला. तसेच सावंतवाडी सरपंच संघटनेनेही जाहीर पाठिंबा दिला.
सर्व खाणमालकांना आपल्या खाणीमधून काढलेला खनिज वाहतूक निगुडे गावातून करू नये. आपणास जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग खनिकर्म शाखा या विभागाने मंजूर केलेल्या रस्त्यावरून वाहतूक करावी. पुनश्च या गावातून गौण खनिज वाहतूक आढळून आल्यास या कार्यालयाकडून गौण खनिज वाहतुकीबाबत दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे पत्र खाणपट्टा धारक व सरपंच ग्रामपंचायत निगुडे यांना देण्यात आले.
सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या पत्रांच्या लेखी आश्वासनांतर्गत निगुडे सरपंच यांनी आपले आंदोलन मागे घेतले व प्रशासनाला इशारा दिला की यानंतर गावातून जर वाहतूक केली गेली तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचे राहील, असा इशारा सरपंच समीर गावडे यांनी यावेळी दिला.
त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी महसूल सावंतवाडी यांनी जिल्हा खनीकर्म अधिकारी सिंधुदुर्ग खनिज उत्खननास परवाना देण्याचे अधिकार आपल्या कार्यालयात असल्यामुळे तसेच ओवरलोड खनिज होत असल्याचे अर्जदार यांनी नमूद केल्यामुळे हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा आणि खनिकर्म विभागकडे सादर करण्यात आला, असेही उपविभागीय अधिकारी महसूल यांनी पत्रात म्हटले आहे.
यावेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, निगुडे माजी सरपंच शांताराम गावडे, शेर्ले सरपंच उदय धुरी, माजी सरपंच दयानंद धुरी, निगुडे माजी उपसरपंच शिवा सावळ, निगुडे तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण निगुडकर, राजेश मयेकर, किशोर जाधव, वसंत जाधव, महेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी दळवी, पत्रकार प्रवीण परब, संदीप नाईक, शंकर सावंत, उपसरपंच भिकाजी केणी, सत्यवान राणे, आदी १०० ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.