रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारी भागामध्ये बांगडे, म्हाकुळ सारखे मासे मोठ्या प्रमाणात मिळू लागले असल्याने, परप्रांतीय नौकांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काल सकाळी रत्नागिरीच्या किनारपट्टीपासून सतरा वावामध्ये तीस ते चाळीसहून अधिक परप्रांतीय नौका मासेमारी करत असताना निदर्शनास आल्या. त्या नौका परप्रांतीय असून, वेगाने हालचाल करत असल्याचे मच्छीमार्यांनी हेरले.
रत्नागिरीच्या हद्दीत सध्या बांगडा, म्हाकुळ सारखा मासा मुबलक मिळत आहे. तो मारण्यासाठी ते मच्छीमार येतात. त्या परप्रांतीय नौकांच इंजिन वेगवान असल्यामुळे स्थानिक जुन्या नौका त्यांच्यापुढे जाऊ शकत नाहीत. पण अशा प्रकारे नियमित मासेमारी होत राहिली तर स्थानिक मच्छीमारांना मासाच मिळणे कठीण बनणार आहे, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्याच्या हद्दीतील जयगड, दाभोळ किनार्यांवरही या मलपी नौकांचा वावर वाढलेला दिसून येत आहे. बांगडा, म्हाकुळ मासा मारण्यासाठी झुंडीने या मलपी नौका किनार्यावर येत असल्याचे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे असून याकडे मत्स्य विभागाकडून कारवाई केली जावी, अशी मागणी होत आहे.
दाभोळ येथील मच्छीमारांनी परजिल्ह्यातून येणार्या फास्टर नौकांविरोधात कारवाईसाठी आंदोलन पुकारलेले आहे. दोन दिवसांपूर्वी मत्स्य विभागाकडून एका कर्नाटकमधील नौकेवर कारवाई करण्यात आली असून ती नौका जप्त केली आहे. आणि त्यावरील मासळीचा लिलाव सुद्धा करण्यात आला. त्यांच्यावर पाच पट दंडाची कारवाई केली जाणार असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले. मत्स्य विभागाकडे गस्तीसाठी एकच नौका असल्यामुळे परप्रांतीय नौकांवर कारवाई करण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे या परप्रांतीय मलपी नौकांचा समुद्रात राजरोस वावर सुरुच आहे.