संगमेश्वर तालुक्यातील संभाजीनगर येथील ग्रामस्थांचा संयम अखेर संपला असून, गेली ३० ते ४० वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘रस्ता नसेल, तर मत नाही’, असा ठाम निर्धार करत ग्रामस्थांनी येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. केवळ आश्वासनांवर वर्षानुवर्षे तग धरलेल्या या वस्तीत आजही पक्का रस्ता नसणे म्हणजे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे. संभाजीनगर वस्तीत ५०० हून अधिक नागरिक वास्तव्यास असून, मुख्य रस्त्यापासून वस्तीकडे जाण्यासाठी आजही एकही पक्का रस्ता उपलब्ध नाही. नागरिकांकडे दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने असली, तरी सुमारे ५०० मीटर अंतरावर वाहने थांबवावी लागतात. त्यानंतर दगडधोंडे, खाचखळगे आणि उतार असलेल्या अरुंद वाटेने जीव धोक्यात घालून पायी चालावे लागते, अशी विदारक परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.
या रस्त्याअभावाचा सर्वाधिक फटका अपंग नागरिकांना बसत आहे. या वस्तीत पाच ते सहा अपंग व्यक्ती वास्तव्यास असून, काहींना शासनाकडून व्हीलचेअर देण्यात आल्या आहेत. मात्र, पक्का रस्ता नसताना व्हीलचेअर ही केवळ दिखाऊ मदत ठरत असून, ती अपंगांच्या वेदनांवर मीठ चोळण्यासारखी असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. अपंग किंवा वृद्ध नागरिक आजारी पडल्यास परिस्थिती अधिकच भयावह होते. वाहन घरापर्यंत पोहोचू शकत नसल्यानें आजही रुग्णांना डोलीच्या आधाराने ने-आण करावी लागते. या वस्तीत राहणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचे हालही थांबलेले नाहीत. दररोज लहान मुले चिखलातून, घसरणाऱ्या आणि धोकादायक वाटांवरून शाळेत जातात. पावसाळ्यात घसरून पडणे, जखमी होणे अशा घटना नेहमीच घडतात. शिक्षणाचा गजर करणाऱ्या शासनाने या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असा आरोप पालकांनी केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहालाही रस्ता नाही परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह असून सुद्धा तेथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसणे ही बाब सामाजिक न्यायाच्या संकल्पनेची थट्टा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आंबेडकरांच्या नावाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चिखलातून व धोकादायक वाटेने प्रवास करावा लागतो, यावरून प्रशासनाची संवेदनशून्यता ठळकपणे समोर येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांत पंचायत समि तीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वारंवार पाठपुरावा केला. आमदार, खासदार आणि स्थानिक पुढाऱ्यांनी निवडणुकांच्या काळात दिलेली आश्वासने मात्र मतपेट्या बंद होताच विसरली गेल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होते आहे. आता आश्वासन नको, रस्ता हवा, अशी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरवासीयांनी येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

