बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत रत्नागिरीत मंगळवारी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जोरदार निदर्शन करण्यात आली. जयस्तंभ परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘जय श्री राम’च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. रत्नागिरीचे आ. उदय सामंत आणि राजापूरचे आ. किरण सामंत यांच्यासह अनेकजण या निदर्शनामध्ये सामील झाले. केंद्रात मोदी सत्तेत आल्यानंतर ज्यापद्धतीने पाकिस्तानला धडा शिकवला तसाच धडा आता बांगलादेशला शिकवण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशलाही आता भारताने जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी आमदार उदय सामंत यांनी यावेळी बोलताना केली. लवकरच केंद्राकडे तशी मागणी करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हिंदू एकवटला – बांगलादेशात सध्या मोठा हिंसाचार सुरू आहे. त्याठिकाणी भारतीय नागरिकांना लक्ष करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. हिंदू, बौद्ध व इतर अल्पसंख्यांक जमातीवर हे जीवघेणे हल्ले सुरू असून मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना सध्या बांगलादेशात घडत आहेत. भारतीय नागरिकांवर होणारे हल्ले याविरोधात आता हिंदू एकवटला असून राज्यात सर्वत्र निदर्शने, मोर्च सुरू झाले आहेत. रत्नागिरीतदेखील मोठ्याप्रमाणात निदर्शने करण्यात आली.
जोरदार निदर्शने – हिंदूत्ववादी संघटनांच्यावतीने मंगळवारी रत्नागिरीत निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना, भाजप, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार उदय सामंत व राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी देखील या निदर्शनांमध्ये सहभागी होत बांगलादेशात घडणाऱ्या घटनांचा निषेध नोंदवला.
धडा शिकविण्याची वेळ – यावेळी बोलताना आमदार उदय सामंत म्हणाले की, बांगलादेशला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. केंद्रात मोदींनी सत्तेत आल्यानंतर ज्यापद्धतीने पाकिस्तानला धडा शिकवला त्यापद्धतीनेच आता बांगलादेशला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. केवळ निदर्शने करून स्वस्थ बसायचे नाही तर केंद्राकडे तशी मागणी होण्याची गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ती मागणी करूया, असे आवाहन आ. सामंत यांनी केले. यावेळी ‘जय श्री राम’च्या घोषणांनी जयस्तंभ परिसर दणाणून गेला. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना हिंदू जनजागृती समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आ. उदय सामंत, आ. किरण सामंत यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.